पुण्यातला कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण फुरसुंगीतल्या ग्रामस्थांनी पाच दिवसांपासून कचरा डेपो बंद केला आहे. त्यामुळे पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये चार दिवसांपासून कचरा पडून आहे. पुणेकरांना कचरा कोंडीचा सामना करावा लागतो आहे. भूमी ग्रीन लिमिटेड या कंपनीला कचरा निर्मुलनासाठी २३ कोटी ४५ लाख रुपयांचं कंत्राट मंजूर करण्यात आलं. मात्र या कंपनीने कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावलेली नाही. पुरेशी साधनं नाहीत असं कारण या कंपनीने दिल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
उरळी आणि फुरसुंगीकरांनी कचरा टाकू देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून पुणे शहरातील कचरा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे सोसायट्यांमध्ये कचरा तसाच पडून आहे. दुसरीकडे कचरा डेपोमुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी, साथीचे आजार आणि डासांची पैदास यामुळे उरळी आणि फुरसुंगी गावातले गावकरी त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने या ग्रामस्थांकडे १० एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे.

अधिक वाचा  मोठ्या मोठ्यांना जागा दाखवली “३महिन्यांत मी हे राज्यही तुमच्या हातात देतो”, पवारांकडून सूचक संकेत