कोल्हापूर: बोर्डाची परीक्षा टाळण्यासाठी शिक्षकानेच विद्यार्थिनीला दिले किटकनाशक
विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा अत्यंत महत्वाची असते. करीयरला दिशा देणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवावेत, यासाठी शिक्षक नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. पण कोल्हापूर जिल्ह्यात याउलट घटना घडली आहे. विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा द्यायची नव्हती. म्हणून शिक्षकाने तिला पिण्यासाठी किटकनाशके दिली.
या मुलीची दहावीच्या परीक्षेची तयारी झाली नव्हती. आजारी पडल्याचे कारण देऊन तिला परीक्षा टाळायची होती. शिक्षकाने दिलेले किटकनाशक पाण्यात मिसळून पिल्यानंतर या मुलीची प्रकृती खालावली. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. या मुलीच्या मृत्यूनंतर विष प्राशनाच्या या प्रकरणात शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली.
गुरुवारी अटक करण्यात आलेल्या या शिक्षकाने मुलीला विषारी द्रव्य दिल्याचे कबूल केले आहे. या शिक्षकाला सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २० फेब्रुवारीला मुलगी प्रॅक्टीकल परीक्षेसाठी शाळेत गेली होती. त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याचे तिने सांगितले. तिला लगेच कोल्हापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मागणीवरुन तिला किटकनाशके दिल्याचे आरोपी शिक्षकाने सांगितले. विद्यार्थिनीला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला किटकनाशक का दिली? यामागे शिक्षकाचा काय हेतू होता याचा तपास करण्यात येणार आहे.