मुंबई: मुंबई पोलिसांचे नवे बॉस कोण या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह (Parambir Singh) यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सेवानिवृत्त झालेल्या संजय बर्वे यांनी आज आयुक्तपदाची सूत्रे खाली ठेवल्यानंतर काही तासांतच सिंह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आजच ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
महाराष्ट्रच नव्हे, देशातील अत्यंत महत्त्वाचं व प्रतिष्ठेचं पद असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून पोलीस वर्तुळात होती. परमबीर सिंह यांच्याबरोबरच पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांचंंही नाव या शर्यतीत होतं. ज्येष्ठतेचा निकष लक्षात घेतल्यास या पदासाठी इतरही अनेक नावे होती. मात्र, मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीशी ज्येष्ठत्वाचा संबंध नसल्यानं गृहखात्याला निवडीची संधी होती. महाविकास आघाडी सरकारनं परमबीर सिंह यांना पसंती दिली आहे.
परमबीर सिंह हे १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सिंह हे पोलीस दलातील एक कार्यक्षम व धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा त्यांच्या कार्यकाळात लागलेला आहे. त्यांनी याआधी ठाण्याचं पोलीस आयुक्तपद भूषवलं आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सिंह यांच्या मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्तीमुळं रिक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार याच विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपिन के. सिंग यांच्याकडं सोपवण्यात आला आहे.