मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहेस, तशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी प्रथमच राज्यसभेची निवडणूक एकत्र लढणार असल्याने पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जात आहे.
महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या सातही जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शरद पवार यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फौजिया खान यांना उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे. शिवाय खान यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने राज्यसभेसाठी मुस्लिम चेहरा देण्याचा प्रयत्नही केला आहे. फौजिया खान या माजी मंत्री आहेत.
राज्यातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी चार जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असून दोन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली असून त्यांनी अद्याप राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तर भाजपकडून रिपाइंचे नेते रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. दुसऱ्या जागेसाठी भाजपचे सहयोगी उमेदवार संजय काकडे आग्रही आहेत. तर भाजपमध्ये नुकतेच परतलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नावही राज्यसभेसाठी चर्चेत आहे. मात्र, काकडे यांनी उदयनराजे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्याने भाजपसमोर डोकेदुखी निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप काकडेंच्या पदरात राज्यसभेचं दान टाकणार की उदयनराजेंना तिकिट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  अजितदादा गटातही स्वबळाचे वारे? बड्या नेत्याचं विधान काय? महायुतीला धक्का बसणार? मित्रपक्ष सोबत घेईल हे विसरा