पुणे : नुकत्याच सादर झालेल्या महापालिका अंदाजपत्रकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो प्रोटोकॉलनुसार छापण्यात आला नसल्याने ही अंदाजपत्रकाची सर्व पुस्तके नगरसचिव विभागाने परत मागवली आहेत. स्थायी समितीचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर या अंदाजपत्रकांच्या प्रती नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्या सर्व परत घेण्यात येत आहेत.
बुधवारी मुख्यसभेत सादर करण्यात आलेल्या अंदाजपकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला दुय्यम स्थान देण्यात आले होते. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभागृहात आक्षेप घेतला तसेच अंदाजपत्रकाच्या सभेचे काम रोखले. ही चूक मान्य करून त्यात बदल करण्याच्या सूचना महापौरांनी न दिल्यास अंदाजपत्रकाच्या चर्चेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
त्यामुळे मुख्यसभेत काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या वादावर अखेर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मध्यस्थी करत अंदाजपत्रकातील पाने बदलणे तसेच प्रोटोकॉलनुसार फोटो बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, ही पुस्तके त्यापूर्वीच वाटप झाली होती.

अधिक वाचा  शिवसेना सत्तेत असूनही नगरपंचायतीत ४ क्रमांक का ठरला?