कल्याण : मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पहिल्यांदाच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ’27 गावांची वेगळी महापालिका करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियत साफ दिसते. मात्र पालकमंत्र्यांची तशी दिसत नाही,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीचे नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची आज भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 27 गावांबाबत मनसे आमदार राजू पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोंबिवलीत आले होते. त्यावेळी 27 गावांबाबत इथल्या लोकांच्या भावना त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. लोकांच्या भावना असतील तर 27 गावांचा निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना त्यावेळी दिले. तर मुख्यमंत्र्यांची नियत साफ दिसते परंतू नगरविकास खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री यांची नियत साफ दिसत नाही.’
येत्या आठवड्यात याबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचम राजू म्हणाले. तर नवीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे चांगले काम करत असून त्यांच्या कामातून आपल्याला सकारात्मक संकेत मिळत आहेत. नागरिकांच्या हिताच्या सर्वच गोष्टी करण्यासाठी निधीची आवश्यकता नसते. काही लहान लहान गोष्टी प्रशासकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असतात ज्या केल्याने नागरिकांचा त्रास कमी होऊ शकतो. हे या आयुक्तांनी स्कायवॉक मोकळा करून दाखवून दिल्याचे सांगत आमदार पाटील यांनी आयुक्तांच्या कामाबाबत कौतुकाची थाप दिली.

अधिक वाचा  "ज्याची बायको पळते त्याला.....", नाना पटोलेंचं पुन्हा वादग्रस्त विधान