लोणी : विवाह सोहळ्यातील पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देत अहमदनगर जिल्ह्यात एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडलाय. लोणी प्रवरानगर इथल्या या विवाह सोहळ्यात विवाहाची सर्व जबाबदारी महिलांनी उचलली. या लग्नसोहळ्याचीपंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली.
लग्न समारंभ म्हटलं की, पुरूष ठरवतील तसंच महिला आजवर करत आल्यात. मात्र, आजचा हा विवाह सोहळा यास अपवाद ठरलाय. आणि याचं कारण होतं ते समारंभात दिसलेली वुमन पॉवर. या लग्नाची सर्व जबाबदारी महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली. पाहुण्यांच्या स्वागतापासून ते अंतरपाट, निवेदन आणि पौराहित्यही महिलांनीच केलं. नवरा आणि नवरीच्या मागे उभं राहणाऱ्या मामाची जागाही मामीनं घेतली.
लोणी प्रवरानगर येथील म्हस्के कुटुंबातील संचिता आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी गावातील गायकवाड कुटुंबातील अनिकेत यांचा विवाह गुरूवारी संध्याकाळी पार पडला. तोही अगदी आगळा वेगळा.’बेटी बचाओ बेटी पढाओ’चा नारा देत पुरूषप्रधान संस्कृतीला महिलांनी बाजूला करत विवाह समारंभाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतापासून नवरी नवरदेवाच्या मागे उभ्या राहणाऱ्या मामाची जागाही मामींनी भरून काढली, अंतरपाठ धरायलाही महिलाच, निवेदकही महिलाच आणि लग्न लावायलाही महिलाच अगदी सगळ्याच जबाबदाऱ्या महिलांनी पार पाडल्यात.
लग्न समारंभागातील महिलांचा सहभाग बघून नवरा नवरीही भारावून गेले. मुलांच्या जन्मापासून कायम सोबत असणाऱ्या स्त्रियांच्या साथीनेच संचिता आणि अनिकेतच्या संसाराची होणारी नवी सुरुवात बघून सर्वच भारावले होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना अशा समारंभामध्येही बरोबरीने काम करता यावी, असा या मागचा उद्देश होता.
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना अशा समारंभातही बरोबरीची जागा मिळावी हा उद्देश यामागे असल्याचं महिला म्हणताहेत. आपल्या संसाराची सुरुवात महिला सक्षमीकरणाचा नारा देत झाल्याने नवरीच्या चेहऱ्यावरही आनंद होता. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत पार पडलेला हा विवाह सोहळा बदलाच्या दिशेने सुरुवात करेल हे मात्र,नक्की.