दोन दिवस चाललेल्या हिंसाचारात ईशान्य दिल्ली होरपळून निघाली. अनेकांची दुकानं, घरं जमावाच्या हल्ल्या उद्ध्वस्त झाली. तर अनेकांचे जिवही गेले. अनेकांच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला. कुणाचा मुलगा मारला गेला, तर कुणाचा भाऊ. दिल्लीतील हिंसाचारात घडलेल्या अनेक काळजाचा ठोका चुकवणाऱ्या समोर येऊ लागल्या आहेत. यातील एक घटना आहे, अशफाकची. हिंसाचार करणाऱ्या जमावानं त्याचं नाव विचारलं. त्याच्या तोंडून अशफाक असं ऐकताच त्यांच्या गोळ्या झाडल्या. अशफाकचा मृतदेह एका रुग्णालयात पडून आहे.
२२ फेब्रुवारी रोजी घरातून बाहेर पडलेला अशफाक परत घरी परतलाच नाही. आता त्याचे आईवडिल, भाऊ त्याचं पार्थिव घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर ताटकळत बसले आहेत. अशफाकचा भाऊ मदस्सिरनं अशफाकसोबत घडलेली घटना सांगितली. “२२ फेब्रुवारी रोजी अशफाक आपल्या मित्रांसोबत कार्यालयातून परत येत होता. ब्रुजपुरी पुलावर अशफाकसह त्याच्या मित्रांना जमावानं घेरलं. हातात हत्यारं असलेल्या या जमावाच्या तावडीतून अशफाकच्या मित्रांनी सुटका करून घेत पळ काढला.
अशफाक जमावाच्या तावडीत सापडला. त्यांनी अशफाकची चौकशी सुरू केली. टोळक्यातील एकानं अशफाकला त्यांचं नाव विचारलं. अशफाक असं नाव सांगितल्यानंतर गर्दीतील एकानं गोळीबार केला. काही क्षणात त्याच्या छातीत पाच गोळ्या गेल्या. त्यानंतर काहीजणांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. हे सगळं अशफाकचे मित्र दूरून बघत होते. मात्र, त्यांना काहीच करता आलं नाही. जमाव निघून गेल्यानंतर त्याच्या मित्रांनी अशफाकला जीटीबी रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, रस्ते बंद होते. रस्त्यावर खूप गर्दी होती. त्यामुळे अशफाकला रुग्णालयात घेऊन जातानाही अडचणी आल्या. अनेक अडथळ्यांनंतर रुग्णालयात दाखल केलेल्या अशफाकनं दोन तासातच जीव सोडला,” असं अशफाकचा भाऊ मुदस्सिरनं सांगितलं.
दहा दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
लग्नानंतर अवघ्या १० दिवसातच अशफाकची पत्नी विधवा झाली. १४ फेब्रुवारीलाच अशफाकचं लग्न झालं होतं. त्यानंतर २२ फेब्रुवारी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. अशफाकच्या कुटुंबीयांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपींची ओळख पटवून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.