पुणे : पीएमपी बसने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तवणुकीवर कारवाई करण्याचे टार्गेट तिकीट तपासणीस पथकाला देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक तपासणीस पथकातील कर्मचाऱ्याला विनातिकीट प्रवाशांकडून दर महिन्याला 11 हजार रुपये दंड वसूल करावा लागणार आहे.

टार्गेट पूर्ण झाल्यास पीएमपीला दर महिन्याला सरासरी किमान 17 लाख 60 हजार रुपये महसूल मिळणार आहे. पीएमपी संचलनातील उत्पन्नाला फुकट्या प्रवाशांमुळे अधिक गळती लागली असण्याची शक्‍यता आहे.

ती रोखण्यासाठी तिकीट तपासणींची पथके वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या 20 ऐवजी आता 40 पथके कार्यरत करण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक पथकातील कर्मचाऱ्यांची संख्याही 3ऐवजी 4 करण्यात आली आहे. तसेच, पथकांसाठी वाहनेदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  भाजप आणि मनसेला उद्धव ठाकरे यांचा मोठा झटका; एकाच वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी गळाला

या निर्णयानंतर पथकांनी प्रत्येक महिन्यात 11 हजार रुपये दंड वसुली आणि कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणाचा अहवाल सादर करणे सक्तीचे केले आहे. पीएमपीने प्रशासनाने उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वसूल होणारा दंड 11 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि गैरवर्तवणुकीचे अहवाल सादर केले नाहीत, तर अशा पथकावर कडक कारवाई केली जाणार आहे.