मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवा निवृत्त झाले आहेत. मुंबई पोलीस पथकाकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नायगाव मैदानात त्यांचा शानदार निरोप समारंभ पार पडत आहे. त्यांच्याजागी कोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लागते, मुंबईचे पोलीस आयुक्तपद कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. तसंच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त होणारा अधिकारी महासंचालक दर्जाचा असेल की अतिरिक्त महासंचालक दर्जाचा याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार नाही असं राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केलंय.

नायगाव पोलीस मुख्यालयात बर्वे यांच्या निरोप समारंभाची तयारी झाली. आज सकाळी ८ वाजता बर्वे यांना पोलीस मुख्य़ालयात अधिकाऱ्यांतर्फे समारंभपूर्वक निरोप दिला जात आहे. मात्र काल रात्री उशीरापर्यंत नव्या आयुक्तांच्या निवडीची घोषणा झालेली नाही.

अधिक वाचा  गंभीरने अखेर मौन सोडलं, हेड कोच होताच विराटबाबत स्पष्टच म्हणाला

मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं समजतंय. अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकदेशम यांचीही नावं चर्चेत आहेत. दिल्लीमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेले सदानंद दाते आता महाराष्ट्रात परतलेत. त्यांच्याकडे सध्या कोणतंही पद नाही. दाते आयुक्तपदाच्या शर्यतीतील डार्क हॉर्स ठरू शकतात.