पिंपरी : देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांच्या कुशीत असलेल्या भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी या चार ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून स्थापन करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. नगरपालिका ते महानगरपालिका आणि आता महानगर या प्रवासात शहराचा वेगाने विकास झाला असून गेल्या काही वर्षांत शहराचा कायापालट झाला आहे.
गावखेडय़ांचे शहर, अशी सुरुवातीची ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक भागात प्रशस्त रस्ते, भव्य उड्डाणपूल, उंच इमारती, मोठे प्रकल्प होत असल्याने शहराचे रूपडे पालटले आहे. २५ लाख लोकसंख्येच्या शहरातील या विकासात्मक बदलाची दखल केंद्र तसेच राज्य सरकारनेही घेतली असून देशभरातील ६५ शहरांतून पिंपरी-चिंचवडची ‘बेस्ट सिटी’ म्हणून निवड झाली होती. त्याचप्रमाणे राज्य पातळीवरही सर्वाधिक ‘क्लीन सिटी’ म्हणून शहराचा गौरव यापूर्वी झाला आहे. मेट्रोसारख्या प्रकल्पामुळे शहराच्या नावलौकिकात आणखी भरच पडणार आहे.
शहर विकासाचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने ४ मार्च १९७० ला नगरपालिका स्थापन करण्यात आली. औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला येत असलेल्या या शहरात पोटापाण्यासाठी हजारोंच्या संख्येने कामगार येत होते. त्यांना हक्काची घरे मिळावीत, या हेतूने १९७२ मध्ये प्राधिकरणाची स्थापना झाली. अण्णासाहेब नगरपालिकेचे पहिले शासननियुक्त नगराध्यक्ष झाले, ते पाच वर्षे पदावर राहिले. १९७८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत श्री. श्री. घारे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. त्यानंतर, प्रशासकीय घडी बसू लागली.
१९८२ मध्ये सांगवी ते थेरगाव पट्टय़ातील गावे समाविष्ट झाली. लोकसंख्येच्या निकषानुसार नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. १९८२ ते १९८६ चार वर्षे प्रशासक असलेल्या हरनामसिंह यांनी भरघोस झाडे लावून शहराचे वैभव वाढवले. १९८६ मध्ये महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा ज्ञानेश्वर लांडगे पहिले महापौर झाले.
* नगरपालिकेची स्थापना – ४ मार्च १९७०
* प्राधिकरणाची स्थापना – १४ मार्च १९७२
* परिवहन समितीची स्थापना – ४ मार्च १९७४
* महापालिकेची स्थापना – ऑक्टोबर १९८२
* महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक – १९८६
* सध्याच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन १९८७
वर्ष लोकसंख्या
१९७१ ८३ हजार ४५२
१९८१ – २ लाख ४९ हजार
१९९१ – ५ लाख १७ हजार
२००१ – १० लाख ६ हजार
२०११ – १७ लाख २९ हजार
२०२० – २५ लाख (अंदाजे)
शहराचा झपाटय़ाने विकास झाला. खेडेगावांचे अल्पावधीत महानगरात रूपांतर झाले. ग्रामीण संस्कृती जपतानाच शहराने आधुनिकतेची कास धरली. ग्रामीण संस्कृतीचे समृद्ध नागरी जीवनात झालेले रूपांतर आश्चर्यकारक आहे. ५० वर्षांतील वाटचाल पाहता, शहराचा पूर्णपणे कायापालट झाला आहे.
– श्रीकांत चौगुले, पिंपरी-चिंचवड शहराचे अभ्यासक

अधिक वाचा  NDAच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं नुकसान?;  कमी मंत्रिपदाचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम