राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा असं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता. त्याचा निषेध करत किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिलं आहे.
किशोर तिवारी यांनी काय तक्रार केली आहे?
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनाही राजकीय आगपाखड करण्यापासून आवरा देवेंद्र आणि अमृता फडणवीस जी टीका करत आहेत त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत, ते जवळ येणं आणखी कठीण होतं आहे. निवडणूक निकालानंतर जी युती होऊ शकली नाही आणि भाजपाला सरकार बाहेर जावं लागलं हे देवेंद्र फडणवीस यांच्या अरेरावीमुळे झालं
देवेंद्र फडणवीस यांचा अतिआत्मविश्वास त्यांना नडला
अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे अशोभनीय आहे. भारतीय संस्कृतीतील पती आणि पत्नीच्या संस्कृतीला धक्का देणारं आहे. अमृता फडणवीस यांना भाजपा हा पक्ष टेक ओव्हर करायचा आहे का? अमित शाह, नितीन गडकरी यांच्या यांच्या पत्नी कुणावरही टीका करत नाहीत. सीतेने रावणाला शिव्या दिल्याचं ऐकिवात नाही जे काही करायचं ते राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी केलं.
अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे २०२४ मध्ये भाजपाला नुकसान होऊ शकतं हे मुद्दे या पत्रात मांडल्याचं समजतं आहे. अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेली टीका आणि खासकरुन आदित्य ठाकरेंवर केलेली टीका ही शिवसेनेला चांगलीच झोंबली आहे. अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करणारं एक पत्रच शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाला लिहिलं आहे.
काय आहे प्रकरण?
एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीस यांनी शिवसेनेवर जाहीर भाषणामध्ये टीका केली होती. आझाद मैदानात मंगळवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षाने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत बांगड्या भरल्या आहेत का? हे वक्तव्य मागे घ्या असं म्हटलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. त्याच प्रत्युत्तरावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस ?
“कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असं ट्विट अमृता यांनी केलं होतं.
याच ट्विटवरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी संघाला पत्र लिहून अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांना आवरा अशी मागणी केली आहे.

अधिक वाचा  ‘…तर आम्ही विधानसभेला 288 जागा लढवू’; मनोज जरांगे पाटलांची उपोषणाला बसत मोठी घोषणा