मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक खोचक व्यंगचित्र भाजपाने पोस्ट केलं आहे. भाजपा महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे व्यंगचित्र ट्विट करण्यात आलं आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंची खिल्लीही उडवण्यात आली आहे.
काय आहे व्यंगचित्रात?
वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे आकाशात भेटले आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे वीर सावकर यांना उद्देशून म्हणतात, “तात्याराव काय म्हणू आता मी! मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल. पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली ” आता या व्यंगचित्रामुळेच चांगलाच वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केलं. जनतेचा कौल महायुतीलाच मिळाला होता. मात्र मुख्यमंत्रीपद अर्धे वाटून घेण्यावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात काडीमोड झाला. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून दूर रहावं लागलं. त्यामुळे भाजपा गेल्या तीन महिन्यात आक्रमकपणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करते आहे. त्यातही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर वारंवार निशाणा साधला जातो आहे. आता या व्यंगचित्रातून बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांचा संदर्भ देऊन भाजपाने शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर शरसंधान केले आहे. आता या व्यंगचित्राचे काही उत्तर शिवसेनेकडून दिले जाणार का ? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.