पुणे -पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांमधील 2 हजार हेक्‍टर जमिनींचे भूसंपादन करण्यात येणार आहे. थेट खरेदीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असून येत्या मार्चपासून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. दरम्यान, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांबरोबर चर्चा होणार असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही राम यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली. पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्‍टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार दिले आहेत. 2 हजार 832 हेक्‍टर जागेपैकी पैकी 2 हजार हेक्‍टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार हेक्‍टर जागेचे संपादन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पावणे दहा कोटी जमा
भूसंपादनासाठी 3 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भूसंपादनासाठी सात उपजिल्हाधिकारी यांची नियुक्‍ती केली असून आवश्‍यकता भासल्यास अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल. मात्र, विमानतळासाठी जागेचे संपादन सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
मोबदला जिल्हा प्रशासन ठरविणार
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याचे आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून येणे अपेक्षित आहे. थेट पद्धतीने जमिनी खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना द्यावयाचा मोबदला जिल्हा प्रशासन ठरविणार असून मात्र त्यासाठी नियमावली विमानतळ विकास कंपनी तयार करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध पॅकेज देण्यावर विचार
पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी यापूर्वी चार पर्याय जिल्हा प्रशासनाने दिले होते. अंतिम निर्णय मात्र विमानतळ विकास कंपनीच घेणार होती. आता शेतकऱ्यांकडून थेट जमिनीची खरेदी केली जाणार आहे. मात्र, हे शेतकरी भूमिहिन होणार आहे. त्यांच्यासाठी पॅकेजमध्ये वेगळा पर्याय देता येणे शक्‍य आहे का, यावर विचार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

अधिक वाचा  निधी देतो, कचाकचा बटण दाबाच्या वक्तव्यावर अजित पवार यांचं स्पष्टीकरण