मुंबई : काही महिन्यांपूर्वी ‘उबर इट्स’ने व्यवसाय गुंडाळल्यानंतर आता अॅमेझाॅन कंपनी फूड डिलिव्हरी सेवेत नशीब आजमावणार आहे. कंपनीकडून बंगळुरात फूड डिलिव्हरी सेवा सुरु केली असून झोमॅटो आणि स्विगीशी स्पर्धा करणार आहे.
देशात आॅनलाइन फूड मागविण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असून फूड डिलिव्हरी क्षेत्राची प्रचंड वाढ झाली आहे. अॅमेझाॅनने फूड डिलिव्हरी व्यवसायासाठी उद्योजक नारायण मूर्ती यांच्या कंपनीशी भागीदारी केली असल्याचे हाॅटेल व्यावसायिकांनी म्हटलं आहे.
एकीकडे झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांनी ग्राहकांच्या सुविधांवर कात्री लावली आहे. अशा स्थितीत अॅमेझाॅनने फूड डिलिव्हरी सेवेसाठी जोरदार तयारी केली आहे. दोन तासांच्या आत वस्तू घरपोच करण्याची सुसज्ज यंत्रणा अॅमेझाॅनकडे आहे. त्यामुळे फूड डिलिव्हरीसाठी कंपनीला या यंत्रणेचा फायदा होणार आहे. सध्या कंपनीने केवळ कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु केली आहे. बंगळुरात निवडक ठिकाणी ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु आहे.
झोमॅटो आणि स्विग्गी या कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अॅमेझाॅनकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरियन आणि जापनीज खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या हाॅटेल व्यावसायिकांशी करार करण्यात आला आहे. हाॅटेल व्यावसायिकांना १० ते १५ टक्के कमिशन दिले जाणार आहे.
नुकताच उबरने फूड डिलिव्हरी व्यवसायाची विक्री केली होती. उबरची उपकंपनी ‘उबर इट्स’चा व्यवसाय कंपनीने आपली प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोला हा व्यवसाय विक्री केला होता. ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवेत प्रचंड स्पर्धा असून ‘उबर इट्स’ला संघर्ष करावा लागला होता. या डीलनंतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवेत झोमॅटोने आपली ताकद वाढवली आहे. झोमॅटोने ‘उबर इट्स’वर ताबा मिळवल्याने फूड डिलिव्हरी बाजारपेठेत झोमॅटोचा ५५ टक्के हिस्सा झाला आहे. अ‍ॅमेझॉनपुढे झोमॅटो, स्विगीचे आव्हान असेल.

अधिक वाचा  अंगणातील दिडवर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला गिन्नी गवतात केलं  ठार; पूर्ण गावावर शोककळा, शेतकरी संतप्त