नवी दिल्ली : दिल्लीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक विधाने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, असा सवाल उपस्थित करत तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली केली. त्यामुळे केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.
हर्ष मंदर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना त्यांनी आगलावू विधाने करणाऱ्या भाजपा नेत्यांवर गुन्हे का दाखल केली नाही अशी विचारणा बुधवारी केली. त्यावर आपण हे व्हिडिओ आपण पाहिले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बातम्यांत हे व्हिडिओ दाखवले आहेत. तरीही तुम्ही हे न पाहणे आश्चर्यकारक आहे, असे ताशेरे न्या. एस मरलीधर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर प्रक्षोभक विधाने करणाऱ्या कपिल मिश्रा, केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर, परवेश शर्मा आणि अभय वर्मा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
सायंकाळी सहा वाजता ही सुनावणी संपल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास उच्च न्यायलयाच्या तीन न्यायाधिशांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. मुंबई उच्च न्यायलयाचे रणजीत मोरे यांची मेघालय उच्च न्यायलयात तर न्या. रवी मालीमठ यांची कर्नाटकमधून उत्तराखंडमध्ये बदली करण्यात आली. न्या. मुरलीधर यांची बदली रात्रीत केली असल्याचे बोलले जात असल्याचे तरी त्या बदल्यांची शिफारस 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.