सोलापूर: मोदीबाबाची अजूनही थोडी थोडी हवा आहे. माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली होती. सुरुवातीची दोन वर्षे मी काहीसा प्रभावितही होतो. चांगलं काम करताहेत, असं वाटतं होतं पण नंतर खरं रूप दिसायला लागलं, अशी शेरेबाजी करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दक्षिण सोलापूरमधील औज येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी देशातील बदलत्या स्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले. देशाची आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. नोकऱ्यांच्या बाबतीत तरुणांची दिशाभूल केली जात आहे. जाती-जातींत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धार्मिक सौहार्द बिघडेल, अशी भूमिका घेऊन देशातील वातावरण दूषित करण्याचे काम केले जात आहे. या सगळ्याचा धोका ओळखून आपण सावध राहायला हवं, असं आवाहन शिंदे यांनी केलं.
राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगावरही शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं. शिवसेनेसारख्या पक्षाला किमान समान कार्यक्रमाच्या धाग्यात जोडून आम्ही महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष सरकार आणलं आहे. ही सुरुवात आहे आणि आता आपली जबाबदारी जास्त वाढली आहे, असेही शिंदे म्हणाले.
तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांचं स्वागत केलं. मोदींचं स्वागताचं भाषण ऐकलं असेल तर ते केवळ ट्रम्प आणि मोदी यांच्यातील मैत्रीविषयींच होतं. त्यावरूनच भारतीयांना ट्रम्प हवेत की अमेरिकेतील जनतेचं पाठबळ हवंय, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे, असे नमूद करताना ट्रम्प-मोदी यांच्यातील वैयक्तिक मैत्रीपलीकडे जाऊन अमेरिकेतील जनता आपल्या पाठिशी आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे, असे शिंदे म्हणाले.

अधिक वाचा  डिजिटल स्ट्रॅटेजी अँड मार्केटिंग ऍनालिटिक्समध्ये पोस्ट ग्रॅड्युएशन डिग्री संपादित केल्याबद्दल संदेश गमरे यांचा जाहीर सत्कार