राजधानी दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून तीन दिवस घडलेल्या हिंसाचाराने ३४ जणांचा बळी घेतला तर २०० पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत. या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं असताना आता बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण खेळत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. शिवाय, त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सल्ला देखील दिला आहे.
दिल्लीतील हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण खेळलं जात आहे. केंद्राने कोणताही हस्तक्षेप न करता पोलीस व यंत्रणेस स्वतंत्ररित्या काम करू दिलं पाहिजे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अन्य राज्यांमध्ये राजकारण करण्यापेक्षा, दिल्लीतील परिस्थिती सर्वसामान्य करण्यात महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. असं मायावती यांनी म्हटलं आहे.
दिल्ली हिंसाचार प्रकरणी आज काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काँग्रेसच्या या प्रतिनिधी मंडळात सोनिया गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवालासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांचा समावेश होता. यावेळी राष्ट्रपतींनी निवेदन देण्यात आलं.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, हिंसाचार रोखण्यात गृहमंत्री व पोलीसांना अपयश आलं आहे. दिल्ली व केंद्र सरकारने हिंसाचाराकडे दुर्लक्ष केलं. या हिंसाचारामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला तर २०० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. कोट्यावधी रुपयांचं नुकसाना झालं आहे. या निवेदनाद्वारे हिंसाचारातील आरोपींविरोधात कारवाई करण्याची व पीडितांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली; दीड वर्षात एकदाही सुनावणी नाही