आतापर्यंत जवळपास ५० देशांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला आहे. सिंगापूरमध्ये ९३, थायलंडमध्ये ४०, तैवानमध्ये ३२, बहरीनमध्ये २६ कुवैत, ऑस्ट्रेलियात २३स मलेशियात २२, फ्रान्समध्ये १८, जर्मनीत १८, भारतात तीन, ब्राझील १, इजिप्तमध्ये एक, जॉर्जियात एक असे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. जगभरात ८२ हजार जणांना संसर्ग झाला आहे. भारतात करोनाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. मात्र, इतर देशांमध्ये भारतीय नागरिक मोठ्या संख्येने असल्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे.
कोरियात करोनाचा फैलाव
चीननंतर दक्षिण कोरियात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण कोरियात आतापर्यंत १५९५ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. एका चर्चमधून करोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याची चर्चा आहे. या चर्चचे अनुयायी करोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
करोनाचा संसर्ग झालेली क्रूझ
जपानच्या योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर ३७११ प्रवासी व कर्मचारी आहे. यापैकी ६९१ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून चौघांचा मृत्यू झाला आहे. जवळपास महिनाभरापासून ही क्रूझ बंदरावर उभी करण्यात आली आहे. हाँगकाँगमधून क्रूझवर आलेल्या प्रवाशाद्वारे इतरांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. क्रूझमधील ११९ भारतीयांना एका विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आहे. तर, १२ जणांवर उपचार सुरू आहेत.
युरोपमध्ये इटलीत करोनाचे बळी
इटलीत आतापर्यंत ४०० हून अधिकजणांना करोनाची लागण झाली असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आतापर्यंत उत्तर इटलीतील ५० हजार जणांना ११ शहरात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर, अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
जगातील बहुतांशी देशांच्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या इराण देशातही करोनाचा संसर्ग झाला आहे. इराणमध्ये १३९ जणांचा संसर्ग झाला असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्र्यालाही करोनाची लागण झाली आहे. सौदी अरेबियाने हज यात्रेकरूचे व्हिसा रद्द केले आहेत. सौदीतही करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशी यात्रेकरूना मक्केत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर, आगमन होणाऱ्या यात्रेकरूंना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अमेरिकेत ५९ रुग्ण; ट्रम्प यांचे आवाहन
अमेरिकेतही करोनाचा संसर्ग होत आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५९ जणांना संसर्ग झाला आहे. भारत दौऱ्यावरून अमेरिकेत परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. अमेरिकन नागरिकांनी करोनाबाबत चिंता करू नये असे आवाहन ट्रम्प यांनी केले.

अधिक वाचा  ठरलं! घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुती 100 उमेदवारांची पहिली यादी?; अमित शहांच्या उपस्थित बैठकीत चर्चा पूर्ण