मुंबई : सभागृहाचं कामकाज सुरू असताना घडलेल्या एका किस्स्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘दोन्ही दादा… अजित दादा असो की चंद्रकांत दादा दोन्ही संवेदनशील, ठोस तात्काळ निर्णय घेतात,’ असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवर भाष्य करत टोला लगावला.
‘ते ठोस निर्णय घेतात. रातोरात शपथ घेतात, हे आम्ही बघितले असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला. चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर शेरेबाजी केल्याचं कळताच अजित पवार हेदेखील पलटवार करण्यासाठी सज्ज झाले. ‘तुम्ही रातोरात विषय काढला म्हणून बोलतो…’ असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
मात्र त्याचवेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवार यांना उद्देशून खालून म्हटले की ‘तुम्ही ऐकू नका आणि मीही ऐकत नाही.’ त्यावर ‘आता फडवणीस साहेब तुम्हीच बोलला म्हणून मी बोलत नाही,’ असं म्हणत अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवर अधिक बोलणं टाळलं.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, पहाटेचा तो शपथविधी…
भाजप आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युती तुटली आणि महाराष्ट्रात मोठं सत्तानाट्य सुरू झालं. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने या ऐतिहासिक आघाडीने सत्तास्थापनेचा प्रयत्न सुरू केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ‘आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही,’ असं म्हणत भाजपने सत्तेपासून दूर होण्याची भूमिका घेतली. मात्र 23 नोव्हेंबरला सकाळी अगदी नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असणारे राष्ट्रवादीचे आमदार राज्याबाहेर गेले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्र फिरवताच राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षाच्या गोटात दाखल झाले. आमदारांनी सोडलेली साथ आणि सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी घेण्याचा दिलेला आदेश, यामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकार कोसळलं.

अधिक वाचा  ‘असं दाखवतायत जणू काही…’ रोहित शर्मा अखेर स्पष्टच बोलला,