हडपसर : भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने त्याच मार्गाने जाणाऱ्या दुचाकीस्वारास चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास जगदंबा हॉटेल समोर हा अपघात झाला. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातील हडपसर सासवड रोडवरील भेकराई नगर येथे ही घटना घडली.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता हडपसर सासवड रोडवर कशा पद्धतीनं भरधाव येणाऱ्या डंपरनं दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. नवीन कुमार धरमसिंग नरगुंड (वय 42)असं या मृत तरुणाचं नाव आहे. सकाळी कामासाठी निघालेला असताना अचानक मागून भरधाव डंपने धडक देत दुचाकीसह चालकालाही चिरडल्यानं खळबळ उडाली. अपघातानंतर डंपरचालक डंपर घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. या डंपर चालकाविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या भेकराईनगरच्या चौकाजवळ सासवडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरचा धक्का दुचाकीस्वारास लागल्याने दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो डंपरच्या चाकाखाली आला आणि या अपघातात डंपरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मागच्या दोन महिन्यात तुकाई दर्शन ते मंतरवाडी फाटा या तीन किलोमीटरदरम्यान 4 जणांना अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.

अधिक वाचा  कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील बड्यांचा नकार, आता आयात उमेदवार देण्याची वेळ