ऊसतोड कामगार नेते आणि भाजपा नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा कारभार आता सामाजिक न्याय विभागाकडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत या महामंडळाचे काम चालत होते.
“राज्यात ८ लाखांहून अधिक ऊसतोड कामगार आहेत, त्यातील बहुतांश हे बीड जिल्ह्यातील आहेत. असंघटित व असुरक्षित असलेल्या या वर्गाला सामाजिक प्रवाहासह सुरक्षा, आर्थिक प्रगती साधण्याचे मोठे आव्हान असून, अत्यंत आनंदाने आपण ते स्वीकारत आहोत. मी स्वतः ऊसतोड कुटुंबातील आहे. ज्या लोकांमध्ये वाढलो, वावरलो त्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची ही खरी संधी आहे,” अशी भावना याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
गोपीनाथ मुंडे हे ऊसतोड कामगारांचे नेते होते. त्यांच्याच मूळ मागणीनुसार हे महामंडळ त्यांच्या नावेच फडणवीस सरकारने सुरू केले होते. याद्वारे ऊसतोड कामगारांना सुरक्षा, आर्थिक प्रगती, त्यांच्या मुलांचे शिक्षण यांसह त्यांच्यासाठीच्या विविध कल्याणकारी योजना तयार करून त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, उद्योग, कामगार व ऊर्जा विभागाकडून या महामंडळाची जबाबदारी आपल्या विभागाकडे सोपविण्यात यावी अशी विनंती धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली होती. त्यानुसार काल (दि.२४) रोजी शासन निर्णयाद्वारे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजीक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आले.