राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. मात्र, या कर्जमाफीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला असून याबाबत त्यांनी थेट राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लिहिलेली ६० हजार पत्रं राज्यपालांकडे सुपूर्द केली.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “ठाकरे सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत. मात्र, कालच्या यादीत केवळ २०८ शेतकऱ्यांचाच यात समावेश करण्यात आला आहे.”
याबाबत या शेतकऱ्यांनी आपल्या रक्तानं सरकारच्या या कारभाराविरोधात पत्रं लिहिली आहेत. या पत्रांमध्ये सरकारने जी कर्जमाफी केली आहे त्याचा त्यांना कुठलाही फायदा मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही ६० हजार पत्रं भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे मुंबईत घेऊन आले. त्यानंतर ती पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आली.
दरम्यान, अधिवेशनाला अजून महिना बाकी असताना दुसऱ्याच दिवशी घाईगडबडीत सुधारित सरपंच निवड विधेयक नियमबाह्य पद्धतीने सभागृहात मंजूर करुन घेण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच अशा प्रकारे नियमाच्या बाहेर काम होत असेल तर राज्यपालांनी यात लक्ष घालून याला परवानगी देऊ नये अशी विनंती त्यांना केली.