मुंबई: दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मरीन ड्राइव्ह येथे काल, सोमवारी रात्री विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या ३० ते ३५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परवानगी न घेता सीएए आणि एनआरसीविरोधात एकत्रित येऊन घोषणाबाजी करत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सीएएविरोधातील नवी दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आतापर्यंत दहा जणांचा या हिंसाचारात बळी गेला आहे. आंदोलकांवर पोलिसांनी आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी हल्ला केल्याचा आरोप होत आहे. या आंदोलकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे काल, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, खबरदारी म्हणून पोलिसांनी गेट वे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या सर्व रस्ते बंद केले होते. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शहरातील कोणत्याही ठिकाणी एकत्रित येण्यास परवानगी नाही. त्यामुळं कुणी विनापरवानगी एकत्र जमल्यास अटक करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता. दरम्यान, गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आल्यानं आंदोलकांनी मरिन ड्राइव्हकडे मोर्चा वळवला होता. यात सहभागी झालेल्या ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएए आणि एनआरसीविरोधात विनापरवानगी एकत्रित जमून घोषणाबाजी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  मविआचे PCMC तील विधानसभा जागावाटप ठरलं?; शहराध्यक्ष गव्हाणेंसह 32 जणांचा शरद पवार गटात प्रवेश!