“भाई, प्लीज मारना मत, बैग मे कुछ नहीं है. में आपके पैर पडता हू, प्लीज मारना मत,” मोटारसायकलवरील तिघे जण अक्षरश: घायकुतीला येऊन म्हणत होते.
दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ईशान्य दिल्लीतल्या भजनपुरा, चांदबाग, जाफ्राबाद या भागात काल रात्रीपासून तणावपूर्ण शांतता आहे.
मी भजनपुरा परिसरातल्या खजुरी चौकातील पुलावर उभा होतो. ब्रिजच्या बरोबर खाली काही माणसं हातात लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन उभे होते. मी खिशातला फोन काढून फोटो काढायचा प्रयत्न केला, तर त्यांनी खालून माय-बहिणीवरुन शिव्या देत मोबाईल खिशात ठेवायला सांगितला. मी मोबाईल खिशात ठेवून दिला.

तितक्यात खालच्या टोळीतले तिघे जण मोटारसायकल घेऊन पुलावर आले आणि ‘फोटो मत खिंचना’ असा दम मला दिला. मी नाही काढत म्हणून सांगितलं. तितक्यात एक गाडी आली आणि त्यांनी पुलावर थांबून फोटो घ्यायला सुरुवात केली. या गाडीवर 3 जण होते. त्यांना बघून हे तिघे जण हातातला रॉड घेऊन त्यांच्यावर धावून गेले आणि ‘कहा से आये हो, फोटो डिलीट करो’, असं म्हणत त्यांना दम दिला. ‘दिखाओ अपना आयडी कार्ड’, असं म्हणत त्यांना विचारणा केली. हे बघून पुढच्या गाडीवरील तिघे अक्षरश: हादरुन गेले आणि त्यांनी हात जोडून जाऊ देण्याची विनंती केली. त्यांनतर त्यांच्याजवळची बॅग चेक करण्यात आली आणि मगच त्यांना तिथून जाऊ देण्यात आलं.

अधिक वाचा  अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट एकच सवाल अन् एकनाथ शिंदे निरुत्तर! आत्ता फक्तं यासाठी आग्रही

हे सुरु असतानाच खालच्या बाजूने ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

‘आझादी लेने वाले, या आझादी देने वाले?’
‘ये लोग (पुला खालचे) आझादी लेने वाले है, या आझादी देने वाले,’ असा प्रश्न माझ्याशेजारच्या एकाने विचारला, तर दुसऱ्याने त्याला उत्तर दिलं की, ‘आझादी देने वाले है.’

‘हा, तो फिर ठीक आहे,’ असं म्हणत प्रश्न विचारणारा तिथून निघून गेला.

‘हिंदू का हाथ कभी देखा नहीं इन लोगो ने, अब देखेंगे. अभी इनका नमाज चल रहा है, वहा इनकी प्लॅनिंग चल रही होगी, नमाज होने के बाद ये लोग बाहर आयेंगे और फिर सुरु होगी लढाई,’ असं म्हणत एकाने गाडीला किक मारली आणि खालच्या बाजूने निघून गेला.

अधिक वाचा  देवाभाऊंना शरद पवारांना मागे टाकण्याची नामी संधी; शरद पवारांचा चारवेळा मुख्यमंत्री तरीही आता हा विक्रम धोक्यात

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावेळी लाल शर्ट घातलेला हा तरूण हातात बंदूक घेऊन दिसून आला. काही क्षणानंतर दुसऱ्या बाजूचा म्हणजेच मुस्लीम गट हातात दगड, काठ्या घेऊन बाहेर आला आणि मग दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडांचा मारा सुरु केला. दगड, रॉड, आगीचे गोळे जे हाताला मिळेल, ते घेऊन जमावातील युवक एकमेकांवर तुटून पडले.

इतक्यात आमच्यासमोरच दोन गटांमध्ये मारामारी सुरु झाली आणि एका गटाने रॉडने एका युवकाच्या डोक्यावर, छातीवर वार केले. तो काही क्षण रस्त्यावर तसाच पडून होता, त्यानंतर काही वेळानं त्या युवकाला एक गट घेऊन गेला.

हे सुरु असताना पोलीस मात्र एका बाजूला गुपचूप उभे होते. त्यानंतर काही क्षणात पोलीस चौकीवर दगडांचा मारा सुरु झाला आणि परिस्थिती बिघडत चालल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला.

त्यानंतर पोलसांनी दोन्हीकडच्या गटांना शांत केलं. तोवर वातावरणात आगीचे लोळ दिसू लागले होते आणि परिसरात अॅम्बुलन्सचा आवाज ऐकू येऊ लागला होता.

अधिक वाचा  महायुती सरकार 2.0 शपथविधी सोहळ्यात असे प्रखर हिंदुत्व दाखवणार; 10000 कार्यकर्ते करणार ही पुन्हा घोषणा…

‘प्रशासन काहीच का करत नाही?’
यानंतर शेजारीच असलेल्या चांदबाग परिसरात मी गेलो.

इथं एका दुकानाच्या दरवाजाला गोळी लागल्यामुळे निर्माण झालेलं छिद्र दिसून आलं.

त्याबद्दल विचारल्यावर स्थानिक मोहम्मद सलीम यांनी सांगितलं, “पलीकडच्या कॉलोनीतल्या लोकांनी काल संध्याकाळी गच्चीवर येऊन इकडच्या दुकानांवर फायरिंग केली. CAA विरोधी निदर्शनं ज्या तंबूत सुरू होतं, त्याच्यावर हल्ला करण्यात आला.”

याच भागातील गुलशेर यांनी सांगितलं, “सध्याच्या परिस्थितीमुळे आम्हाला 1984च्या दंग्यांची आठवण येत आहे. त्यावेळीही प्रशासनानं काहीच केलं नव्हतं आणि आताही प्रसाशन काहीच करत नाहीये. प्रशासनाला आम्हाला एकमेकांशी लढवायचं आहे का? आता दिल्ली हे राजधानीचं शहर आहे,असं वाटत नाहीये.”

चांदबागमध्ये जाऊन काही लोकांशी बोलल्यानंतर त्यांचे बाईट शूट करून आम्ही परतायला लागलो, तेव्हा मध्येच आम्हाला काही तरुणांनी डवलं आणि फोनमधील व्हीडिओ डिलीट करायला सांगितलं. तिथं आम्हाला धक्काबुक्कीही करण्यात आली. कसंबसं करुन आम्ही तिथून निसटलो आणि मुख्य रस्त्याला लागलो. रस्त्यावर थोडं समोर आलो तोच एक ठिकाणी दोन गट एकमेकांवर दगडफेक करताना दिसून आले.