पुणे: राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पुन्हा एकदा जंगलाच्या राजाचा रूबाब पहायला मिळणार आहे. संग्रहालयात नुकतेच नव्याने एक आशियाई सिंह दाखल झाला असून, यंदाच्या उन्हाळी सुट्टीत नागरिकांना पुन्हा एकदा आशियाई ‘पवन’ प्राणीसंग्रहालयात बागडताना दिसणार आहे.
राजीव गांधी प्राणीसंग्रहलयात तीन वर्षापूर्वी ‘तेजस’ आणि ‘सिब्बू’ ही आशियाई सिंहाची जोडी गुजरातमधील सक्करबाग प्राणीसग्रंहालयातून दाखल झाली होती. यापैकी तेजस’चा काही महिन्यांपूर्वी मृत्यु झाला होता. त्यामुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जंगलच्या राजाची उणीव प्रकर्षाने भासत होती. त्यामुळे हा सिंह या प्राणी संग्रहालयात आणला आहे. या सिंहाचे नाव पवन असून, तो मध्यप्रदेशातील इंदौरमधील प्राणीसंग्रहालयातून एक आठवड्यापूर्वी पुण्यातील या प्राणीसंग्रहालयात दाखल झाला आहे. त्याचे वय चार वर्ष नऊ महिने आहे. सध्या या सिंहाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले, असून त्याचे निरीक्षण सातत्याने टिपण्यात येत आहे.
याबाबत प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव म्हणाले,’संग्रहालयाच्या ‘एक्चेंज’ उपक्रमांतर्गत ‘पवन’ येथे दाखल झाला आहे. याबदल्यात संग्रहालयातर्फे जाळीदार अजगर इंदौर येथील प्राणीसंग्रहालयाला देण्यात आला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या सिंहाचे स्थलांतर करण्याची तयारी सुरू होती. प्राणी संग्रहालयात दाखल झाल्यानंतर 21 दिवस सर्वांपासून दूर ठेवण्यात आले आहे. स्थलांतर केल्यानंतर प्राण्यांचा स्वभाव, त्यांचे हावभाव यात काही फरक पडतो का? हे निरीक्षण करणे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आवश्यक आहे. त्यासाठी सिंहाचे विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. त्याचनुसार ही प्रक्रिया केली जात आहे. ही विलगीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणत:तीन आठवड्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिंहाचे दर्शन खुले केले जाणार आहे.’