नवी दिल्ली : मासिक पाळी सुरू असताना स्त्रीने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा मिळेल. पुरुषाने अशा स्त्रीच्या हातचा पदार्थ खाल्ला तर तो बैल होईल, असे तारे तोडणाऱ्या एका स्वामींची बातमी काही आठवड्यांपूर्वी गाजली होती. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सोमवारी एक अनोखा प्रयोग मुद्दाम करण्यात आला. ‘महावारी महाभोज’ म्हणजे पाळीतली मेजवानी – Period Feast असंच या कार्यक्रमाचं नाव ठेवण्यात आलं होतं आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या मेजवानीचा यथेच्छ आस्वाद घेतला. या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर दिवसभर फिरत होते.
दिल्लीतल्या मयूर विहार भागात एका मोठ्या उद्यानात महावारी महाभोज हा कार्यक्रम झाला. या मेजवानीसाठी ज्या महिला पदार्थ शिजवत होत्या, स्वयंपाक करत होत्या त्या सगळ्यांनी एक पांढऱ्या रंगाचा एप्रन घातला होता. “मैं महावारी में हूं, I’m a proud menstruating woman असं त्या एप्रनवर लिहिलेलं होतं.
भूजच्या स्वामी नारायण मंदिराचे स्वामी कृष्णस्वरूप दास यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या बातम्या देशभर गाजल्या होत्या. मासिक पाळीदरम्यान स्त्रियांनी स्वयंपाक करू नये. त्यांनी स्वयंपाक केला तर त्या कुत्री होतील आणि जे पुरुष त्यांच्या हातचं जेवतील ते बैल होतील, असे तारे या स्वामींनी तोडले होते.
या पार्श्वभूमीवर मासिक पाळीविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी ही मेजवानी सार्वजनिक उद्यानात आयोजित करण्यात आली होती. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या उपक्रमाला उपस्थिती लावली होती.
सोशल मीडियावर दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचे या मेजवानीचा आस्वाद घेतानाचे फोटो व्हायरल झाले. त्याबद्दल सिसोदिया यांचं कौतुकही करण्यात येत होतं.

अधिक वाचा  भारतीयांसाठी येतोय दमदार स्वदेशी पर्याय Micromax In Note 2 उद्या होणार लाँच