पुणे -चीनमध्ये करोना व्हायरस वाढल्यामुळे चीनसह इतर देशांतूनही मागणी कमी झाल्यामुळे नैसर्गिक वायूच्या किमती कमी होणार आहेत. भारतामध्ये पुढील काही आठवड्यांत नैसर्गिक वायूच्या किमतीत 25 टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्याचे गृहीत धरले जाऊ लागले आहे.
…तर ग्राहकांना थेट फायदा मिळू शकणार
दरम्यानच्या काळात जर यावरील कर वाढले नाहीत तर त्याचा फायदा थेट ग्राहकांना मिळू शकतो. यामुळे गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो. मात्र, नफा कायम राहू शकतो. मुळातच या कंपन्यांना गॅस स्वस्तात मिळत असल्यामुळे या कंपन्या गॅसचे दर कमी करणार असल्याचे समजले जाते. दर कपातीचा भारत फायदा घेऊ शकतो. मात्र, दरम्यानच्या काळात करोनाला भारतात येण्यापासून आणि त्याचा फैलाव वाढण्यापासून रोखण्याची गरज आहे.
भारतामध्ये नैसर्गिक वायूची आयात करून त्याचा पुरवठा ओएनजीसी आणि ऑइल इंडिया या कंपन्या प्रामुख्याने करतात. जागतिक पातळीवरील मागणी कमी झाल्यामुळे या नैसर्गिक वायूचे दर 25 टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्याचे संकेत या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जर तसे झाले तर नैसर्गिक वायूचे दर अडीच वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाणार आहेत. आयात वायू स्वस्त होणार असल्यामुळे देशात तयार झालेल्या गॅसच्या दरातही घट होणार आहे.
नैसर्गिक वायूचा उपयोग स्वयंपाकाचा गॅस, सीएनजी, खत आणि वीज निर्माण करणाऱ्या कंपन्या इंधन म्हणून वापरात. 1 एप्रिल आणि 1 ऑक्‍टोबर रोजी तत्कालीन परिस्थितीच्या आधारावर या गॅसचे दर ठरविले जातात.

अधिक वाचा  धनंजय पोवार याने दिली निकी तांबोळीला ‘ही’ मोठी ऑफर, थेट म्हणाला, मी तुला…