वृत्तसंस्था; भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीसंबध अधिक दृढ व्हावेत यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज, मंगळवारी अत्यंत महत्त्वाची चर्चा होत असून, ३ अब्ज डॉलरच्या करारांवर या चर्चेत शिक्कामोर्तब होऊन त्यांची घोषणा केली जाणार आहे.
अमेरिका भारताला अत्याधुनिक लष्करी हेलिकॉप्टरांसह अन्य लष्करी साहित्यांची विक्री करणार असून, त्या सर्व व्यवहारांची एकूण रक्कम ३ अब्ज डॉलरच्या घरात जाणार आहे. या करारांविषयीची माहिती ट्रम्प यांनी सोमवारी ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमातील भाषणात दिली. याच करारांवर मंगळवारी ट्रम्प-मोदी यांच्या सह्या होणार आहेत.
‘अमेरिका भारताला जगातील सर्वोत्तम आणि सर्वात भेदक लष्करी सामग्री देणार आहे. अमेरिका जगातील सर्वोत्तम शत्रे बनवते. मग ती विमाने, जहाजे असोत की क्षेपणास्त्र आणि रॉकेट’, असे सांगत, आम्ही आता भारताशी करार करत आहोत आणि अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आणि सशस्त्र तसेच निशस्त्र हवाई वाहनांचा या करारांमध्ये समावेश असेल’, असे ट्रम्प म्हणाले. भारत अमेरिकेकडून २४ ‘एमएच-६० रोमिओ हेलिकॉप्टर’ (२.६ अब्ज डॉलर) आणि ६ एएच- ६४ ई अपाचे हेलिकॉप्टर (८० कोटी डॉलर) विकत घेणार आहे.
भारतीय उपखंडात सध्या अनेक भू-राजकीय घडामोडी घडत असून, चीन आपले लष्करी आणि आर्थिक शक्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि मोदी यांच्यात होत असलेली चर्चा अमेरिका-भारत संबंध अधिक दृढ होत चालल्याचे स्पष्ट संकेत जगाला देईल, असे सांगण्यात येते.
‘व्यापार करारा’बाबत अनिश्चितताच
संरक्षणविषयक करारासह ट्रम्प आणि मोदी यांच्यात व्यापार, गुंतवणूक या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. मात्र, आधीच जाहीर झाल्यानुसार या दोन्ही देशांत व्यापारविषयक व्यापक करार होण्याची शक्यता नाही, हे स्पष्ट आहे. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेत एच१बी व्हिसा, उर्जा, धार्मिक स्वातंत्र्य, अफगाणिस्तानातील तालिबानबरोबरचा प्रस्तावित शांतता करार, इंडो-पॅसिफिक भागातील परिस्थिती यांचाही समावेश असेल, असे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय, बौद्धिक संपदा हक्क, व्यापारसुलभता आणि देशाची अंतर्गत सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याविषयी पाच करारही मंगळवारी होतील, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी जाहीर केले होते.
‘करार’नामा
-२४ ‘एमएच-६० रोमिओ हेलिकॉप्टर’ (२.६ अब्ज डॉलर)
-सहा एएच- ६४ ई अपाचे हेलिकॉप्टर (८० कोटी डॉलर)
-इतरही लष्करी सामग्री, यंत्रणा
-बौद्धिक संपदा हक्क, व्यापारसुलभता, अंतर्गत सुरक्षा क्षेत्रविषयी सहकार्य करार