भाजपाचे नेते आणि मीरा भाईंदर मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आज अचानक पक्षाच्या पदाच्या राजीमाना दिला. सर्व पदांचा राजीनामा दिल्यानं भाजपाला आणखी एक धक्का मिळाला आहे. सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपाला राजकीय धक्के बसू लागले आहेत. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना चार नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर भाजपाचे नेते गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपात आलेले आणखी सहा आमदार राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा आहे. त्यात भाजपाचे नेते नरेंद्र मेहता यांनीही पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेहता यांनी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आमदार गीता जैन यांनी त्यांचा पराभव केला होता.
पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली. “भाजपातील सर्व पदांचा आपण राजीनामा देत असून, माझ्या पाठिशी राहणाऱ्या आणि मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार. मीरा भाईंदरमधील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह पक्षातील कार्यकर्ते व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची दिलीगिरी व्यक्त करतो,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सोलापूरमधील खासदारकीचीही जागा धोक्यात –
भाजपाला सोलापूरमध्ये मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. सोलापूरचे भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं जात पडताळणी समितीनं म्हटलं असून, त्यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांची खासदारकी धोक्यात आली आहे.