मुंबई: महाविकासआघाडी सरकारकडून सोमवारी शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ६८ गावांतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेल्या १५,३५८ शेतकऱ्यांची नावे आहेत. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी परभरणीतील शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले. विठ्ठलराव गरुड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. आता लेकीच्या लग्नाला या, असे आपुलकीचे निमंत्रण विठ्ठलराव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
तर अहमदनगरमधील पोपट मुकटे यांनी पूर्वीसारखे कर्जमाफीसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्यावेळी पाच ते सहा वेळा फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. मात्र, यावेळी एका थम्बवरच (अंगठ्यावर) काम झाले, असे मुकटे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची दुसरी यादी आता २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होती. मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

अधिक वाचा  पुणे विद्यापीठाला ऑफलाईन परीक्षा घेता येणार राज्य शासनाची मान्यता