पुणे : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व व विश्वकल्याण प्रत्यक्षात उतरविणारे राजे होते. लोककल्याण हेच अंतिम ध्येय असणारा कृतिशील राजा शिवरायांनी समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, संरक्षण अशा सर्वच मानवतावादी लोककल्याणकारी तत्त्वांचे निर्माण केली आहे. परंतु , शिवरायांचा हा ज्ञान देणारा विचार 21 व्या शतकात सुद्धा प्रभावीपणे पुढे येत नाही. इतिहासातील मोजके रंजक प्रसंग लोकांच्या पुढे मांडण्यापेक्षा त्यांच्या लोककल्याणकारी राज्य व्यवस्थेचा प्रचार-प्रसार झाल्याशिवाय खरे शिवराज्य स्थापन होणार नाही असे परखड मत इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी व्यक्त केले.
अखिल फुरसुंगी शिवजयंती उत्सव आयोजित “शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा आणि फुरसुंगी गावच्या भूमिपुत्रांचा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी इतिहास संशोधक दत्ताजी नालावडे, शिवव्याख्याते महेश टेळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर तुपे, शिवप्रहार संघटना जिल्हाध्यक्ष कैलास आवारी, अखिल फुरसुंगी शिवजयंती उत्सव अध्यक्ष उत्तम कामठे, मारुती काळे, मच्छिंद्र कामठे, विवेक तुपे, संदीप लहाने, गोरख कामठे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नलावडे म्हणाले, “मानवतावादी मराठा तत्त्वज्ञानाचा राजा म्हणजे शिवराय आहेत.शोषित, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, अबाल, तरुण, वीर, शूर, वैज्ञानिक, कलाकार अशा अनेकांना शिवरायांची प्रेरणा आजही मिळत आहे. लोककल्याणाचा वसा आणि वारसा शिवरायांनी निर्माण करून दिला आहे. त्याच भांडवलावर आजची व्यवस्था सुरू आहे. भारत देशावर मुगल, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश अशा अनेकांनी राज्य केले. स्वातंत्र्यपूर्वकाळात आणि स्वातंत्र्यानंतरही आजच्या लोकशाही भारतामध्ये छत्रपती शिवराय यांनी दिलेला लोककल्याणकारी विचारांचा कृतिशील वारसा कोणालाही पुसून काढता आला नाही किंवा भविष्यात पुसता येणार नाही. छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा कृतिशील वारसा पुढे घेऊनच प्रत्येकाला राज्य चालवावे लागेल. शिवव्याख्याते महेश टेळे यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी फुरसुंगी गावचे भूषण आणि भूमिपुत्र असणारे नोबेल हॉस्पिटल चे संचालक डॉ एम बी अबनावे, निवृत्त डी वाय एस पी प्रकाश देशमुख, जय मल्हार उद्योगसमूहाचे संचालक विशाल कामठे यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार आणि माजी मुख्याध्यापिका सुनंदा हरपळे माजी प्राचार्य सुलोचना काळाणे यांना राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक श्रीमंतयोगी प्रतिष्ठान, द्वितीय स्नेहल अंकित पटणे आणि तृतीय भरत बुसरे विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. सहभागी 200 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र हरपळे आणि आभार योगेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला आणि नागरिकांची उपस्थिती होती.