छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदाही धुमधडाक्यात साजरी झाली. शिवजयंती साजरी करण्याचे नवनवे फंडे शिवप्रेमींनी आणले. कुठे मिरवणूक, कुठे सेल्फी, कुठे बाईक रॅली तर कुठे डीजे… मात्र या धुमधडाक्यात मूळ शिवविचारच जपण्यास आपण कमी पडतोय का असा अप्रत्यक्ष प्रश्न अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने उपस्थित केला आहे. शिवडी किल्ल्याचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि या फोटोद्वारे त्यांनी शिवप्रेमींना हा प्रश्न अप्रत्यक्षपणे विचारला आहे.
शिवडी किल्ल्याच्या भिंतीवर प्रेमीयुगुलांनी नावं कोरली आहेत तर काहींनी भिंतीवर गिरवून ठेवलंय. या भिंतीसमोर उभं राहून मृणाल कुलकर्णी यांनी फोटो काढला आहे आणि हाच फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचसोबत त्यांनी मनाला भिडणारी एक कवितासुद्धा पोस्ट केली आहे. ‘पलीकडच्या काठावर जिरेटोप घातलेला एक अस्वस्थ माणूस…दोन्ही हातात तलवार घेऊन..स्वतःचे हात कापत होता…’, या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी नि:शब्द करतात.
शिवजयंती दणक्यात साजरी करताना आपण किल्ल्यांचे किती संवर्धन करतो, किल्ल्यांवर पर्यटनासाठी जाताना आपण शिस्त किती बाळगतो, याचा विचार केला पाहिजे, असं त्यांनी या पोस्टद्वारे अप्रत्यक्षपणे म्हटलंय. ‘आपण ही प्रवृत्ती कधी सोडणार’, ‘विदारक सत्य’, अशा प्रतिक्रिया मृणाल कुलकर्णींच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

अधिक वाचा  छगन भुजबळांना जे महायुतीत हवं, तेच शरद पवार गटाला महाविकास आघाडीत हवं; किती जागांची मागणी?