नवी दिल्ली :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump)दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक वेळेनुसार ते रविवार रात्री सव्वा आठ वाजता वॉशिंग्टनहून रवाना झाले आहेत. भारताच्या दौऱ्यावर येत असलेले ते अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष असतील. डोनाल्ड ट्रंप दोन दिवसांत 36 तास भारतात घालवणार आहेत. या दौऱ्यांत ते अत्यंत व्यर्ग असणार आहेत. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत पत्नी मेलानिया ट्रम्प (Melania Trump), कन्या इवांका ट्रम्प आणि जावई येणार आहेत. तसेच एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात पोहोचणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली माहिती अशी की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सोमवारी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांला अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमण होईल. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांला ते साबरमती आश्रमात पोहोचतील. दुपारी 1 वाजून 5 मिनिटाला ते अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ट्रम्प सुमारे 1 लाख 10 हजार नागरिकांना संबोधित करतीत. अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये झालेल्या ‘हाउडी मोदी’च्या धर्तीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुजरातहून दिल्लीला पोहोचण्याआधी डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब आग्रा येथील ताजमहाल निहाळणार आहे. दुपारी 3 वाजून 30 मिनिटांला ते आग्राच्या दिशेने विमानाने रवाना होती. सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांला ट्रम्प आग्रा येथे पोहोचतील. 5 वाजून 15 मिनिटांला ती ताजमहाल परिसराचे भ्रमण करतील. आग्रा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करतील. जवळपास 50 मिनिटे ताजमहाल पाहिल्यानंतर सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांला ते दिल्लीसाठी विमानाने रवाना होतील. सायंकाळी साडे सात वाजता देशाची राजधानी दिल्लीत त्यांचे आगमण होईल.
राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत
भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी राष्ट्रपती भवनात सकाळी 10 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. नंतर 10 वाजून 30 मिनिटांला ट्रम्प राजघाटवर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पाजंली अर्पण करतील. सकाळी 11 वाजता ते हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक औपचारिक बैठक होईल. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांला ते हैदराबाद हाऊसमध्ये उभय नेते सहमती पत्र एकमेकांना देतील.
रात्री 10 वाजता परतीचा प्रवास..
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की, अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या दोन्ही राष्ट्राच्या बाबतीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. संरक्षण, दहशतवाद, विद्युत आदी मुद्द्यांचा चर्चेत समावेश असेल. या दरम्यान पीएम मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सोबतच लंच घेतील.
सायंकाळी डोनाल्ड ट्रम्प सपत्नीक राष्ट्रपती भवनात पोहोचतील रामनाथ कोविन्द त्यांच्यासोबत डिनर घेतील. या डिनरला सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्या आले आहे. रात्री 10 वाजता ट्रम्प अमेरिकेसाठी रवाना होतील.