पुणे – पीएमपीकडे बसेस, बसथांबे तसेच इतर प्रकारच्या जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून तेथील जाहिरातींसाठी पीएमपीने महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार, जाहिरातदर आकारल्यास सध्या मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 4 पट अधिक निधी मिळेल, अशा स्पष्ट सूचना महापालिकेने 2018-19 च्या वार्षिक लेखा परीक्षण केल्या आहेत. पीएमपीने या जाहिरातींसाठी काढलेल्या निविदेमध्ये 2018-19 मध्ये 13 कोटी 42 लाखांचे उत्पन्न अंदाजित केले होते.

मात्र, प्रत्यक्षात 9.77 कोटीच मिळाले असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे जाहिरातींच्या नियोजनाकडे पीएमपीचा कानाडोळा होत असल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. लेखा परीक्षण अहवालानुसार, पीएमपीएमएलच्या ताफ्यात 2000 बसेस असून सुमारे 5000 बस शेड्‌स तर, त्यापैकी 1600 बस शेड्‌स पक्‍क्‍या स्वरुपात आहेत. बसेस व बसस्टॉपवरील जागेचा जाहिरातीसाठी 100 टक्‍के क्षमतेने वापर केल्यास व जाहिरात दर बाजार भावाशी सुसंगत असे ठरविल्यास जाहिरातीच्या उत्पन्नात किमान 4 पटीने वाढ होऊ शकेल.

अधिक वाचा  फडणवीसांवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, सर्वांच्या उंचावल्या भुवया, म्हणाले विदर्भाचा बॅकलॉग भरून निघणार

यासाठी पुणे महापालिकेच्या जाहिरात धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. 2017-18 मध्ये पीएमपीला जाहिरातींमधून 9.77 कोटींचे उत्पन्न मिळाले. हे 2017-18 च्या उत्पन्नापेक्षा 1.52 कोटींनी घटले आहे. तसेच बसेस, विविध प्रकारचे बसस्टॉप, डेपोमधील जाहिरात फलक, बसस्टॅण्ड, कमर्शियल कॉम्पेल्क्‍स, बसडेपो व लॉलीपॉप पिलर्स असे मिळून 25,411 नग/क्षेत्र जाहिरातींसाठी उपलब्ध होतील व त्यापासून 13.42 कोटी रुपये रक्‍कम अपेक्षित उत्पन्न 2018-19 च्या टेंडरमध्ये नमूद तक्‍त्यामध्ये केले आहे. परंतु, प्रत्यक्षात 17298 नग/क्षेत्र जाहिरातींसाठी उपलब्ध झाले आहे व त्यापासून 9.77 कोटी उत्पन्न प्राप्त झाले असल्याने उर्वरित आठ हजार ठिकाणे जाहिरातींसाठी वापरलीच गेली नाहीत. त्यामुळे पीएमपीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.