पुणे – एका बाजूला शहराचा विकास होत असताना, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाकडूनच पुणेकरांनाच फसविण्याचा घाट घातला जात आहे. म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रस्त्याच्या कामासाठी सुमारे 200 हून अधिक झाडे काढण्यात येणार आहे.

त्यातील काही तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात पालिकेच्या पथ विभागाने या रस्त्याच्या दुभाजकांमध्ये जवळपास दिडशेंहून अधिक नवीन वृक्षारोपण केले आहे. मात्र, हे वृक्षारोपण केवळ फोटो सेशन पुरतेच केले असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. ही झाडे लावल्यानंतर त्याला पाणी देण्याचाच विसर पथ विभागाला पडल्याने ही झाडे सुकून गेली असून केवळ काड्या शिल्लक राहिल्या आहेत.

अधिक वाचा  नागपूरमध्येही हिट अँड रन, भरधाव कारने 9 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

महापालिकेकडून कर्वेरस्ता तसेच सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते म्हात्रे पूल हा डीपी रस्ता विकसित केला आहे. याच्या रुंदीकरणात सुमारे 200 हून अधिक झाडे अडथळा ठरत आहेत. त्यातील 90 टक्‍के प्रशासनाकडून काम करताना पूर्णत: काढली आहे. वृक्षप्राधिकरण समितीच्या नियमानुसार, महापालिका अथवा संबंधित खासगी विकसकाने बांधकामासाठी ही झाडे काढल्यास त्या मोबदल्यात 3 पट जादा झाडे लावणे अपेक्षित आहे. तसेच, त्याचे पुरावेही द्यायचे आहेत. पथ विभागाकडून या काढलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवीन झाडे या रस्त्याच्या दुभाजकात लावली आहेत.

त्यांतर्गत या रस्त्यावरील साई बाबा मंदिरापासून ते मॅजेंटा लॉन्सपर्यंत दुभाजकात हे वृक्षारोपण केले आहे. तसेच, या झाडांना क्रमांकाचे टॅगही लावले आहेत. तीन ते चार दिवसांपूर्वी हे वृक्षारोपण केले आहे. त्यानंतर लगेच झाडे लावल्याचे फोटोही पथ विभागाने घेतले. मात्र, त्यानंतर ही झाडे मरण्यासाठी सोडली. या झाडांना एक थेंबही पाणी घातले नसल्याने 60 टक्‍के झाडे जळून गेली आहेत. त्यामुळे ‘कुंपणच शेत खात असेल तर सांगायचे कुणाला’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच, वृक्षतोडीच्या कारभाराबाबत न्यायालयानेही अनेकदा महापालिकेचे कान टोचले असून त्या नंतरही पालिका प्रशासन न्यायालयाची फसवणूक करत असल्याचे वास्तव आहे.

अधिक वाचा  वटपौर्णिमेला पुण्यात अंगावर काटा आणणारी संतापजनक घटना; पत्नीला भुलीचं इंजेक्शन अन् फरफटत नेत डांबलं

राज्य शासनाचे वृक्षारोपणाचे कामही इथेच
या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. तर रस्त्याचा दुभाजक तयार करून दोन वर्षे झालेली आहे. याच दुभाजकांमध्ये राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सतत 100 ते 200 झाडांचे वृक्षारोपण केले जात आहे. ही पावसाळ्यापूरती तग धरतात. त्यानंतर दुभाजकाचे काम अथवा माती बदलण्याचे काम अथवा केबल टाकण्याच्या कामासाठी ही झाडे पुन्हा काढून टाकत जागा रिकामी केली जाते. अशीच स्थिती शहरातही आहे. त्यामुळे शासनाच्या वृक्षारोपन मोहिमेवरही या निमित्ताने प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.