मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यावरुन शिवसेनेने नरेंद्र मोदी सरकारला टोला लगावला आहे. ट्रम्प यांच्या आगमनाप्रीत्यर्थ अहमदाबादचे रस्ते चकाचक झाले व झोपडय़ा वगैरे दिसू नयेत म्हणून रस्त्याच्या कडेस भिंती उभारल्या गेल्या. ट्रम्प यांच्या आगमनापेक्षा या लपवाछपवीचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांचे स्वागत भव्य तर होईलच, पण 15 किलोमीटरचा रोड शो होत आहे. ट्रम्प हे दिल्लीत जातील व मग त्यांचा राजकीय किंवा सरकारी दौरा सुरू होईल. अहमदाबादेत फक्त जल्लोष, पण दिल्लीत केजरीवाल सरकारने सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची पाहणी ‘ट्रम्प’ पती-पत्नी करतील. मग मोदी सरकारने केलेल्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार? हा प्रश्न शिल्लक राहतोच असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून लगावला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दौरा व्यापारवाढीसाठी आहे. म्हणजे आयात-निर्यात, देवाण-घेवाण यावर भर दिला जाईल. अमेरिकेच्या बाबतीत देवाण कमी व घेवाण जास्त झाली तर रुपयास बळकटी येईल. कारण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळलेलाच आहे. देशातील बेरोजगारी वाढली आहे. आर्थिक मंदीचा कहर सुरू आहे. ट्रम्प यांच्या 36 तासांच्या हिंदुस्थान भेटीने हे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. तरीही प्रे. ट्रम्प या पाहुण्याचे स्वागत करायला हवे. पाहुणचार आणि शिष्टाचारात कुठेही आर्थिक मंदीच्या झळा बसता कामा नयेत असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

अधिक वाचा  पवार काका पुतण्यात दिलजमाई? भाजपाचा ‘तिरंगी’चा प्रयत्न; अजितदादांसाठी आत्ता रोहीत पवारांचाच पलटवार

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फक्त 36 तासांच्या हिंदुस्थान भेटीवर येत आहेत. त्यांच्या भेटीबद्दल देशभरात कमालीची उत्सुकता वगैरे शिगेला पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते काही तितकेसे खरे नाही.
ट्रम्प हे अमेरिकेसारख्या स्वतःस महासत्ता वगैरे समजणाऱया व त्याबरहुकूम जगात फौजदारी करणाऱया एका देशाचे अध्यक्ष आहेत. ट्रम्प येतील व जातील. 36 तासांनंतर त्यांच्या येण्या-जाण्याच्या खुणाही देशाच्या मातीत राहणार नाहीत.
ट्रम्प यांनी तिकडे वॉशिंग्टनमध्ये सांगितले की, ”मी हिंदुस्थान भेटीवर जात आहे व तिथे पंतप्रधान मोदी यांच्याशी व्यापारावर चर्चा करणार आहे.” म्हणजे ट्रम्प यांच्या भेटीचा मतलब साफ झाला आहे. त्यांना येथे व्यापार वाढवायचा आहे व त्यासाठी ते 36 तासांसाठी येत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आल्याने येथील गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही. मग ट्रम्प यांच्या येण्याचे येथील जनतेला कौतुक किंवा उत्सुकता असण्याचा प्रश्न येतोच कुठे?
ट्रम्प यांच्या आगमनाविषयी कुठे उत्सुकता असलीच तर ती अहमदाबादेत असायला हरकत नाही. ट्रम्प यांचे हिंदुस्थानच्या भूमीवरील पहिले भव्य स्वागत हे अहमदाबादेत होईल. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 50-60 लाख लोकांचा जनसमुदाय हजर राहील व तो ‘केम छो, केम छो ट्रम्प’ अशा घोषणा देईल. ट्रम्प हे दिल्लीत येऊन हिंदुस्थानसाठी काय देणार ते कुणीच सांगू शकत नाही.
पंतप्रधान मोदी यांच्याशी होणाऱया चर्चेत ट्रम्प हे हिंदुस्थानात धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याच्या मुद्दय़ास हात घालतील असे प्रसिद्ध झाले आहे. ट्रम्प यांनी यात न पडलेलेच बरे. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, शाहीन बाग हे आमचे देशांतर्गत मुद्दे आहेत व त्यातून येथील राज्यकर्ते मार्ग काढतील.
हा देश लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले लोक चालवतात आणि त्यांना देशाचे स्वातंत्र्य व स्वाभिमान याबाबत बाहेरच्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अहमदाबाद, दिल्ली, आग्रा वगैरेचे ‘पर्यटन’ करावे व कार्यक्रम आटोपावा हेच बरे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दौरा व्यापारवाढीसाठी आहे. म्हणजे आयात-निर्यात, देवाण-घेवाण यावर भर दिला जाईल. अमेरिकेने हिंदुस्थानला ‘विकसनशील देशां’च्या यादीतून गेल्याच आठवडय़ात वगळले आहे. ट्रम्प यांच्या हिंदुस्थानी दौऱयाच्या तोंडावरच नेमके अमेरिकेने हे का केले, हा प्रश्नच आहे.
दोन वर्षांपूर्वी ‘विकसनशील देशांसाठी’ असलेल्या सवलतींच्या यादीतूनही अमेरिकेने हिंदुस्थानच्या नावावर फुली मारली होती. त्याचा हिंदुस्थानला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे. या आणि अशा काही मुद्दय़ांबाबत ट्रम्प काही सकारात्मक संदेश देतील का?