लखनौ : उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे शास्त्रज्ञांना मोठी सोन्याची खाण सापडली आहे (Gold Mine found in Sonbhadra). या खाणीत तब्बल साडेतीन हजार टन सोनं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ज्या भागात हे सोनं आहे तिथे विषारी साप असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या खाणीचं उत्खनन करण्याअगोदर केंद्र सरकारपुढे या विषारी सापांचं मोठं आव्हान आहे.
शास्त्रज्ञांना सोनभद्रतील दोन जागांवर सोन्याच्या खाणी (Gold Mine found in Sonbhadra) असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ज्या भागात या खाणी आहेत नेमकं त्याचजागी मोठ्या प्रमाणात सापांचा वावर आहे. हे साप एखाद्या फौजेसारखं सोन्याच्या खाणीवर पहारा करत आहेत. विशेष म्हणजे या भागात जगातील सर्वात विषारी सापांची प्रजाती असलेले साप मोठ्या प्रमाणात आहेत.
सोनभद्रच्या सोन्याची खाण असलेल्या परिसरात कोब्रा, मण्यार आणि घोणस या विषारी सापांच्या प्रजातीमधील साप मोठ्या प्रमाणात आहेत. हे साप सोनभद्रच्या सोन्याची खाण असलेल्या विढंमगंज चोपन ब्लॉकमध्ये सर्वाधिक प्रमाणात आहेत. सापांची घोणस ही प्रजात जगातील सर्वात विषारी सापांच्या प्रजातींपैकी एक मानली जाते.
दरम्यान, या प्रजातींच्या सापांचा आकडा नेमका किती आहे? याबाबत निश्चित अशी माहिती मिळालेली नाही. सोनभद्रच्या वन विभागाच्या एका अधिकाऱ्याला याबाबत विचारलं असता, सोनं काढताना वन विभागातून जेव्हा एनओसी घेतली जाईल तेव्हा विषारी सापांचा खरा आकडा समोर येईल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय विभागीय वन अधिकाऱ्याने त्या भागात घोणस, कोब्रा आणि मण्यार जातीचे साप आढले असल्याची माहिती दिली.
सोनभद्र जिल्ह्यात सोन्याची खाण असल्याची माहिती समोर येताच ते सोनं खाणीतून बाहेर काढण्याची औपचारिक प्रक्रिया सरकारने सुरु केली आहे. खाणीचं उत्खनन करण्याअगोदर जिओ टॅगिंगची कारवाई सुरु करण्यात आली. सोन्याची खाण असलेल्या परिसराचं हवाई सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणासाठी उत्तर प्रदेश सरकारने दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली.