नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध होत असतानाच, भारत आणि बांगलादेशातील अवैध नागरिकांच्या प्रश्नावरुन नव्या वादाला सुरुवात झालीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुंबईत काढलेल्या मोर्चातून अवैध बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा मांडला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिवा केलाय की, जर अवैधरीत्या भारतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारतात नागरिकत्व दिलं गेलं, तर निम्मा बांगलादेश रिकामा होईल.
भारत-बांगलादेश सीमा
यावर बांगलादेश सरकारचं म्हणणं आहे की, भारतापेक्षा बांगलादेशची अर्थव्यवस्था सक्षम असल्यानं देश सोडून भारतात का जाईल? बांगलादेशचे गृहमंत्री असदुजमान खान यांनी म्हटलं होतं की, बांगलादेश इतका गरीब देश नाहीये की, इथले नागरिक भारतात जातील. या दोन्ही वक्तव्यांच्या अनुषंगाने बीबीसीनं भारतातील बांगलादेशी नागरिकांची संख्या आणि दोन्ही देशातील आर्थिक स्थितीतला फरक जाणून घेतला.
भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या नेमक्या आकड्याबाबत निश्चिती नाहीय. त्यावरुन अनेकदा गोंधळच दिसून येतो. 2004 साली तत्कालीन गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी संसदेत माहिती दिली होती की, भारतात एक कोटी 20 लाख बांगलादेशी नागरिक अवैधरीत्या राहतायत. तसंच, पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक अवैध बांगलादेशी नागरिक राहत असल्याचाही दावा जयस्वाल यांनी केला होता.
मात्र, पश्चिम बंगाल आणि आसाम च्या विरोधानंतर श्रीप्रकाश जयस्वाल यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. 2016 साली तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी संसदेत सांगितलं की, सध्याच्या आकडेवारीनुसार भारतात अवैध बांगलादेशी नागरिकांची संख्या जवळपास दोन कोटी इतकी आहे. मात्र, किरण रिजीजू यांनी या आकडेवारीचा स्रोत सांगितला नव्हता. त्यानंतर केंद्र सरकारनं स्पष्टही केलं की, अवैध नागरिकांसंबंधी सरकारकडं कोणताच नेमका आकडा नाहीय.
2015-19 च्या नागरिकत्वाचे आकडे सुद्धा यासंदर्भात अतिरिक्त माहिती देत नाहीत. मात्र, या दरम्यान 15 हजारापेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांना भारताचं नागरिकत्व दिलं गेलं. किती बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिलं गेलं?
(स्रोत – भारतीय संसद)
वर्ष 2015 – 14,880
वर्ष 2016 – 39
वर्ष 2017 – 49
वर्ष 2018 – 19
वर्ष 2019 – 25
वरील तक्त्यात 2015 साली नागरिकत्व दिलेल्यांची संख्या (14,880) जास्त दिसते. याचं कारण ज्यावेळी भारत आणि बांगलादेशने सीमेवरील जमिनीची आदलाबदल केली होती, त्यावेळची ही आकडेवारी आहे. अवैध नागरिकांच्या संख्येबाबत कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नाहीय. मात्र, भारतातील राजकीय नेते हे वारंवार सांगत असतात की, अवैध नागरिक भारतीयांच्या नोकऱ्या हिसकावत असतात. एकदा तर भारताचे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अवैध नागरिकांबाबत म्हणाले होते की, “ते जे धान्य खातायत, ते गरिबांना मिळायला हवं.”
बांगलादेशची अर्थव्यवस्था कशी आहे?
सकल राष्ट्रीय उत्पदाना (GDP) ची तुलना करायची झाल्यास, भारतापेक्षा बांगलादेश सुस्थितीत आहे. एखाद्या देशातनं देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत म्हणजे त्या देशाचा GDP असतो. 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर त्या देशाचा GDP काहीसा नकारात्मक होता. मात्र, नंतर वर्षागणिक सुधारत गेल्याचं दिसून येतं. गेल्या दशकभरात तर बांगलादेशच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाची अर्थात GDP ची वाढ वेगानं झालेली दिसून येते. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आशियाई विकास बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, बांगलादेशनं सर्वाधिक वेगानं वाढणारी दक्षिण आशियाई अर्थव्यवस्था म्हणून ओळख निर्माण करत भारतालाही मागे टाकलंय.
2019 मध्ये भारताचा अंदाजे विकास दर 5.3 टक्के होता. मात्र, त्याचवेळी बांगलादेशचा अंदाजे विकास दर 8 टक्के होता. विकास दराबाबतच्या बांगलादेशच्या या आकडेवारीनेच 2018 मध्ये बांगलादेशला सर्वत कमी विकसित देशांच्या ओळखीतून बाहेर काढलं.
दक्षिण आशियातील महागाई दर (2018 ची आकडेवारी)
2018 ची आकडेवारी पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की, 2018 या वर्षात दक्षिण आशियात सर्वाधिक महागाई दर (5.8 टक्के) असलेला देश बांगलादेशच आहे. त्याचवेळी 2018 मध्ये भारतात महागाई दर 3.4 टक्के इतका होता.
तसंच, 2018 मध्ये बांगलादेशातील अंदाजे बेरोजगारी दरही भारतापेक्षा जास्तच होता. या त्या लोकांची संख्या कमी होती, जे प्रतिदिन 1.9 डॉलरपेक्षा कमी रोजगारावर काम करत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी मोजण्यासाठी हाच मापदंड मानला जातो.
या मापदंडावर दोन्ही देशांचं काय म्हणणं आहे?
बांगलादेशनं सामाजिक विकास निर्देशांकात लक्षणीय सुधारणा केल्यात. बालमृत्यू दर आणि आयुर्मानाच्या दरात बांगलादेश भारतापेक्षा पुढे आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशमध्ये जन्म झालेले सर्वाधिक बालकं आपला पाचवा जन्मदिन पाहतात.
महिलांबाबत बोलायचं झाल्यास, भारतात महिला 68..6 वर्षे, पाकिस्तानात 66.5 वर्षे, तर बांगलादेशात 72.5 वर्षांहून अधिक जगतात.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2020 नुसार, भारत 108 व्या स्थानावरुन 112 व्या स्थानावर घसरलाय, तर बांगलादेश 50 व्या स्थानावर आहे.
त्याचसोबत, बांगलादेशच्या संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व सुद्धा अधिक आहे. बांगलादेशच्या संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व 22 टक्के आहे, तर भारतात हीच आकडेवारी 13 टक्के एवढी आहे.