चंदीगढ : शहरातील सेक्टर 32 मध्ये आज दुपारी एका घरात आग लागल्याने तीन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. आगीमध्ये होरपळलेल्या मुलींना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मुलींची नावे रिया, पाखी आणि मुस्कान असल्याचं सांगितलं जात आहे.
आग लागल्याचे समजताच एका मुलीने पहिल्या मजल्यावरून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. तिला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून आग भडकल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
ज्या इमारतीला आग लागली तिथं पहिल्या मजल्यावर मुलींना राहण्यासाठी भाड्याने खोल्या दिल्या होत्या. याठिकाणी बऱ्याच मुली राहत होत्या. जेव्हा आग लागली तेव्हा सुदैवाने जास्त मुली नव्हत्या. आग भडकताच त्यात अडकलेल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सेक्टर 32 मधील एका इमारतीमध्ये पीजी होती. पहिल्या मजल्यावर आग लागल्यानंतर काही मुली सुखरुप बाहेर पडल्या. मात्र आगीत अडकलेल्या तीन मुली होरपळल्या. यात जखमी झालेल्या मुलींचे वय 20 ते 21 वर्षे असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळावर पोलिस पोहोचले असून अधिक तपास करत आहेत.