पुणे :राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसही भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे. एकीकडे पुनर्निवडणुका होतील असे भाष्य भाजपचे काही वरिष्ठ नेते करत असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र ते वारंवार नाकारताना दिसत आहेत. याच मुद्दयावर पुण्यात महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
पुनर्निवडणुका होतील असे भाजपचे काही नेते म्हणत आहेत, त्यावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, ‘ही भाजपाची मानसिकता आहे. त्यांच्याकडे जे आमदार आहेत ते टिकवण्यासाठी त्यांना ‘मी पुन्हा येईन’ असं सांगावं लागत आहे.
ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. त्यात थोरात यांचे पारंपरिक विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विषयीचा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर सुरुवातीला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. अखेर पुन्हा एकदा ‘विखे पाटील’ अस्वस्थ असल्याचे समजते असे विचारल्यावर थोरात यांनी सूचक उत्तर देत नाव घेण्याचे टाळले.
थोरात म्हणाले की, ‘लोकसभा हवा आली आणि आमच काही मंडळी भाजपमध्ये गेली. मी कोणा एकाचं नाव घेणार नाही. त्यात काही मित्र आहेत,त्यांना म्हटलं की, आता काही दिवस थांबा आणि अंतरंग बघून या’. एमआयएमच्या वारीस पठाण यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. या बद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘ही भाजपची बी टीम आहे.समाजात विभाजन होत नाही हे पाहिल्यावर ही भाजपची नवी चाल आहे’.