पुणे : वारकरी शिक्षण घेण्यासाठी मावळातून आलेल्या अकरा वर्षांच्या वारकरी विद्यार्थ्यांला शिक्षक महाराजांनी बेदम मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. विद्यार्थ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान पोहणे असे या महाराजांचे नाव आहे. त्याला त्याचे मूळ गाव ओझर (ता. जिंतूर, जि. परभणी) येथून अटक करण्यात आली आहे. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली असून याप्रकरणी कविता राजू चौधरी (वय-२८, रा. आंबी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. ओम राजू चौधरी असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. या मुलाला आठ दिवसांपासून दवाखान्यामध्ये उपचारासाठी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पिंपरीतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असून ओमची तब्येत गंभीर आहे.
वडील नसल्याने मुलाच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. आळंदीत अभ्यासाला टाकायचं म्हणून निर्णय घेतला आणि एक वर्षांपासून मुलगा आळंदीत आरोपी पाहुण्यांकडे माऊली ज्ञानराज प्रसाद आध्यात्मिक शिक्षण संस्थेत राहून शिकत होता. दरम्यान अचानक राजूच्या आईला फोन आला की तुमच्या मुलाला उलटी, जुलाब होत आहेत; तुम्ही त्याला इथून घेऊन जावा. त्यामुळे ओमला घेऊन जायला त्याचा मामा आणि आई आठ दिवसांपूर्वी आळंदीत आले. त्या वेळेस राजू बेशुद्ध अवस्थेत होता.

अधिक वाचा  महाराष्ट्र हादरणार! ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू? महाराष्ट्र भाजपची उद्धव ठाकरेंनाही घेरण्याचे संकेत

त्याला आनंद हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे उपचारासाठी दाखल केले. दोन-तीन दिवसांनी तो बोलू लागला. मग त्याला विचारलं, काय झालं बाळा, तुला काय झाले? या वेळी त्याने महाराजांनी हात-पाय बांधून मारल्याचे सांगितले. ओमच्या अंगावर मारण्याचे व्रण दिसत होते. यानंतर आळंदी पोलिसांत तक्रार देण्यात आली. याबाबत आळंदी पोलिसांनी सांगितले की, राजू हा हरिपाठ व अभ्यास करत नाही म्हणून आरोपी पाहुणे याने त्याला काठीने छातीवर आणि हातापायांवर मारहाण केली. यात ओम हा गंभीर जखमी झाला आहे.