हैदराबादच्या ओवैसी बंधुंचा एमआयएम पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने शुक्रवारी मुंबईत केला. एमआयएम भाजपच्या इशाऱ्यावर धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करते हे वेळोवेळी स्पष्ट झाले असून, कोणत्याही धर्माची कट्टरता ही देशासाठी घातकच आहे. त्यामुळे एमआयएम आणि भाजप या दोघांचाही निकराने विरोध झाला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.
एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा प्रदेश काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप खा. प्रवेश वर्मा, गिरीराज सिंग इत्यादी भाजप नेत्यांनी ध्रुवीकरणाचा अजेंडा घेऊन जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे पाहायला मिळते. पठाण यांचे वक्तव्यही याच पठडीतील आहे. यामागील अजेंडा या दोन्ही पक्षांनी मिळून एकत्रित तयार केलेला आहे, असा आरोप सावंत यांनी केला.
देशातील सामाजिक एकता, धर्मनिरपेक्षतेचा बळकट पाया कमजोर करण्याचा यामागे उद्देश आहे. याच मार्गाने देशाची फाळणी झाली होती. त्यावेळेस देशातील वातावरण गढूळ करण्याकरिता मुस्लिम लीग, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन शक्ती एकत्रित काम करत होत्या. एकमेकांच्या विरोधाचे नाटक करून हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग एकत्र सत्तेत सहभागीही झाल्या होत्या, असा दावा सावंत यांनी केला. चले जाव आंदोलनाचा विरोध करून यांनी ब्रिटिशांना साथ दिली आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतही मांडला हे ऐतिहासिक सत्य आहे. आज त्यांची जागा भाजप आणि एमआयएम ने घेतली आहे, असा आरोप सावंत यांनी केला.

अधिक वाचा  भाजपाकडून नाना पटोले विरोधात पुण्यात पोस्टरबाजी“आपण पुण्यात कधी येताय, ते सांगा…”;