नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायदा, एनपीआर (राष्ट्रीय जनगणना) यांच्याविरोधात आंदोलने भडकवणाऱ्यांनी आधी कायदा समजून घ्यावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सल्ला दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तासभर चाललेल्या बैठकीत महाराष्ट्राचे प्रश्न व महाविकास आघाडीमुळे बदललेल्या राजकारणावर त्यांच्यात चर्चा झाली. मतभेद दूर ठेवून महाराष्ट्राला मदत करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचे ठाकरे म्हणाले.
देशभर नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन पेटले असताना ठाकरे यांनी मात्र केंद्र सरकारचे समर्थन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी सीएए, एनपीआर समजून घेतले आहे. त्यामुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही. केंद्राने प्रसिद्ध केलेली प्रश्नोत्तरेही तपासली. त्यामुळे ज्यांनी आंदोलन भडकावले त्यांनी ते समजून घ्यावे. त्यानंतरच मत बनवावे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही, सरकार पाच वर्षे पूर्ण करेल.

अधिक वाचा  पुणे पुन्हा ‘हिट ॲण्ड रन’ मुळे हादरले; मार्शल ड्युटीवरील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले एकाचा मृत्यू एक जखमी

राज्याच्या प्रश्नांवर चर्चा
पीक वीमा योजनेची अंमलबजावणी राज्यात नीट होत नसल्याचे आपण पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, १0 जिल्ह्यांतच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. जीएसटीची भरपाईही महाराष्ट्राला मिळणे बाकी आहे.

पत्र लिहिल्यानंतर थोडा वाटा राज्याला मिळाला. यापुढे तो मिळेल, अशी आशा आहे. काही निर्णयांत राज्यपाल अडथळे आणत आहेत, असे विचारता ते म्हणाले की, हा अडवणुकीचा प्रकार नाही. यास केंद्र-राज्य संघर्ष असेही स्वरूप नाही.

अडवाणी, सोनिया यांच्याशीही चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटायला गेले.