मुंबई : दहावी पाठोपाठ बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा (अनुत्तीर्ण) शिक्का पुसण्यात येणार आहे. नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता फेरपरीक्षेसाठी पात्र आणि फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा मिळणार आहे. याबाबत शासनाने निर्णय जारी केला आहे.
नापासाचा शेरा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होतो. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षेत नापास झाल्याचा शेरा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना नैराश्य येत असते. तसेच काही विद्यार्थी यामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव घालविण्यासाठी शासनाने बदल केला आहे. यापुर्वी विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना त्यांनी दहावीच्या फेरपरीक्षेत विद्यार्थी तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र हा शेरा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर सुधारित शेरा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित शेरानुसार नियमित परीक्षेच्या गुणपत्रिकेत विद्यार्थी नियमित परीक्षेतील सर्व विषयात उत्तीर्ण असल्यास उत्तीर्ण हा शेरा दिला जाणार आहे. विद्यार्थी नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण असल्यास फेरपरीक्षेसाठी पात्र आणि विद्यार्थी नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण असल्यास फेरपरीक्षेसाठी पात्र हाच शेरा दिला जाणार आहे.
सीबीएसईच्या अध्यक्षांचं मुलांना भावुक पत्र
तसेच जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या फेरपरीक्षेच्या गुणपत्रिकेत विद्यार्थी सर्व परीक्षेत उत्तीर्ण असेल तर उत्तीर्ण हा शेरा दिला जाणार आहे. विद्यार्थी श्रेणीविषयासह एक किंवा दोन विषयांत श्रेणी विषयासह अनुत्तीर्ण असल्यास फेरपरीक्षेसाठी पात्र आणि श्रेणीविषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र हा शेरा दिला जाणार आहे. हा निर्णय २०२०मध्ये म्हणजे सध्या बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे.