वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोघे 24 फेब्रुवारीला भारतात येतील. गुजरातमधील अहमदाबाद इथून ट्रम्प यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असेलला ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला जातील. ट्रम्प भारतात येण्याच्या आठवडाभर अगोदरच त्यांची खास कार भारतात दाखल झाली आहे. सध्या ट्रम्प यांच्या दौऱ्याची चर्चा जोरात रंगली आहे.
ट्रम्प कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांच्यासोबत फुटबॉल आणि बिस्किट असतं. हा खेळायचा फुटबॉल किंवा खायचं बिस्किट नाही तर यामध्ये संपूर्ण जग उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. फुटबॉल ही एक ब्रीफकेस आहे. काळ्या रंगाची असलेली ब्रीफकेस जगातील सर्वात ताकदवान ब्रीफकेस मानली जाते. यामध्ये अमेरिकेच्या अणु हल्ल्याच्या लाँच कोडसह आणखी काही गोष्टी असतात. या ब्रीफकेसला न्यूक्लिअर फुटबॉल असंही म्हटलं जातं. यात अमेरिकेच्या अणु हल्ल्याची पूर्ण योजना, टार्गेटची माहिती एका पुस्तकात लिहिलेली असते. एखाद्या हॉटेलचं मेन्यूकार्ड असावं अशी माहिती यामध्ये लिहिलेली आहे.
आणखी एक काळ्या रंगाचं पुस्तक या ब्रीफकेसमध्ये असतं. यामध्ये हल्ला झाल्यास लपण्याच्या ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या ब्रीफकेसमध्ये एक आपत्कालिन ब्रॉडकास्ट सिस्टीमही आहे. न्यूक्लिअर फुटबॉलमध्ये एक कार्ड असतं ज्यामध्ये अणु हल्ल्यासाठी कोड लिहिलेले असतात. दिसायला क्रेडिट कार्डसारखं असलेल्या या कार्डला बिस्किट असं म्हटलं जातं. यामध्ये 5 अलार्म असतात. कार्ड हरवलं तर तो वाजवले जातात. ब्रीफकेसमध्ये एक अँटिना लावलेला असतो. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगातील कोणत्याही भागात संपर्क साधू शकतात.
अणु हल्ला करण्याचा निर्णय जर घ्यावा लागला तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सर्व माहिती ब्लॅक बुकमध्ये मिळते. त्यामध्ये जगाचा नकाशा असतो आणि कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा ते ठरवायचं असतं. व्हॉइट हाउसमधून बाहेर पडताना राष्ट्राध्यक्षांसोबत फुटबॉल असतो.
10 मे 1963 मध्ये पहिल्यांदा या ब्रीफकेसचे फोटो समोर आले होते. 1962 च्या क्युबा मिसाइल संघर्षानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेहमी न्यूक्लिअर फुटबॉल सोबत ठेवतात. व्हाइट हाउसशिवाय राष्ट्राध्यक्षांकडे याचे क्लोन असते. आपत्कालिन परिस्थितीमध्ये याचा वापर केला जातो.
बिस्किट झालं होतं गहाळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिस्किट त्यांच्यासोबत बाळगतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्याकडून चुकून हे बिस्किट गहाळ झालं होतं. त्यांनी बिस्किट सूटमध्ये ठेवलं होतं आणि तो सूट ड्राय क्लिनरला दिला होता. अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा त्यांची रक्ताने माखलेल्या कपड्यांना कचऱ्यात फेकलं होतं. त्यासोबत बिस्किटही फेकण्यात आलं होतं. बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळातही काही महिने बिस्किट सापडलं नव्हतं.
चीन दौऱ्यात झाला होता वाद
2017 मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या फुटबॉलमुळे वाद निर्माण झाला होता. चीन दौऱ्यावर जाताना अमेरिका आणि चीन यांच्यात वाद झालेला. ट्रम्प यांच्या सुरक्षा ताफ्यातील व्यक्ती न्युक्लिअर फुटबॉल घेऊन बीजिंगच्या ग्रेट हॉल ऑफ पीपलमध्ये जात होता. तेव्हा चीनच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं. त्यावेळी चीनचे सुरक्षा दल आणि ट्रम्प यांच्या सीक्रेट सर्व्हिस मेंबर एकमेकांवर धावून गेले. त्यानंतर उच्च अधिकाऱ्यांनी मध्यस्ती करत हे प्रकरण सोडवलं.

अधिक वाचा  सुशांतची एक आठवण कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनं केली होती शेअर