पुणे – भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य परिमल धनंजय देशपांडे यांनी भायखळ्याचे माजी आमदार वारीस पठाण यांच्याविरोधात डेक्कन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वारीस पठाण यांनी एका सभेत वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्य केले होते. पठाण यांना अटक करून पुढील कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.
वारीस पठाण यांच्या वक्तव्यामुळे समाजात अशांतता पसरण्याची शक्यता
वारीस पठाण यांनी केलेले चिथावणीखोर वक्तव्य दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे, हिंसेस प्रवृत्त करणारे आहे. अशा बेताल, हिंसक, चिथावणीखोर वक्तव्यामुळे समाजात अशांतता पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 153 अ, 295 अ, 506, 153 अ, 504 कलमांतर्गत त्वरीत कारवाई करावी अशी मागणी देशपांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे.
आम्ही 15 कोटी 100 कोटींवर भारी पडू – पठाण यांचे चिथावणीखोर वक्तव्य
एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी 15 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील गुलबर्गा येथे सीएए विरोधातील सभेत आम्ही फक्त 15 कोटी असलो तरी 100 कोटींवर भारी आहोत हे लक्षात ठेवा असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. एक जागरूक नागरिक व भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून वारीस पठाण सारख्या विषारी सापाला महाराष्ट्रात फिरू देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र पोलिसांकडे परिमल देशपांडे यांनी केली आहे.