नवी दिल्ली : महंत नृत्य गोपाल दास यांना अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि चंपत राय यांना सरचिटणीस म्हणून निवडले गेले. ट्रस्टची आज पहिली बैठक झाली त्यामध्ये ट्रस्टची कार्यकारिणी ठरवण्यात आली. ज्येष्ठ विधीज्ञ के. पराशरण यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीस वेग देण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर बांधकामासाठी देणगी देण्यासाठी अयोध्याच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेत खाते उघडण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. विश्वस्त कोषाध्यक्ष म्हणून पुण्याचे स्वामी गोविंद देव गिरी यांची नियुक्ती करण्यात आली, असे चंपत राय यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
बैठकीस केंद्र सरकारचे प्रतिनिधी, गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश कुमार, उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी अविनाश अवस्थी आणि अयोध्या जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार झा हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 फेब्रुवारी रोजी संसदेत 15 सदस्यांची विश्वस्त संस्था स्थापन करण्याची घोषणा केली होती. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये सात सदस्य, पाच नामनिर्देशित सदस्य आणि तीन विश्वस्त आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयाचे पालन करून हा ट्रस्ट तयार करण्यात आला आहे.

अधिक वाचा  संक्रांतीनिमित्त १ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार