हैदराबाद : रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी बुधवारी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) उल्लेख त्यांनी 21 व्या शतकातील सर्वांत मोठा वेडेपणा अशा शब्दांत केला. जीएसटीचे करविषयक सुधारणांच्या प्रक्रियेतील अतिशय महत्वाचे पाऊल असे वर्णन मोदी सरकारकडून करण्यात आले.
मात्र, स्वामी यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना जीएसटीची खिल्ली उडवली. प्राप्तिकर आणि जीएसटीच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना भयभीत बनवू नये. जीएसटी अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. कुठला फॉर्म कुठे भरायचा हेच कुणाला समजत नाही. तो कॉम्प्यूटरवर अपलोड करण्यास सांगितले जाते. राजस्थानमधील कुणीतरी मला सांगितले की त्यांच्याकडे वीजच नसल्याने फॉर्म अपलोड कसा करायचा? डोक्‍यात अपलोड करून पंतप्रधानांना भेटून सांगा असे मी त्या व्यक्तीला म्हटले, अशी मिश्‍कील टिप्पणी स्वामी यांनी केली.
खर्च करण्यासाठी जनतेकडे पैसा नसल्याने मागणीत झालेली घट ही देशापुढील सध्याची समस्या आहे. त्यामुळे आर्थिक चक्रात अडथळे येत आहेत. भारताला 2030 पर्यंत सुपरपॉवर बनायचे असेल तर वार्षिक विकास दर 10 टक्के गाठायला हवा, असे त्यांनी म्हटले. देशात आर्थिक सुधारणा आणल्याबद्दल माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही.नरसिंह राव यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले जावे, अशी मागणीही स्वामी यांनी केली.

अधिक वाचा  इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन,संयोजकांविरोधात गुन्हा दाखल