मुंबई | सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, वीरेंद्र सेहवाग, ब्रेट ली यासारखे दिग्गज क्रिकेटपटू रस्ते सुरक्षा जागतिक स्पर्धेत पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत लेजंड्‌स विरुद्ध वेस्ट इंडीज लेजंड्‌स या दोन संघांमध्ये 7 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारत लेजंड्‌सचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरसह वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, जहीर खान हे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर एकत्र खेळताना दिसणार आहेत.
क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडेल, असे सामने ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’मध्ये होणार आहेत. पहिला सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्‍या वानखेडे स्टेडियमवर 7 मार्च 2020 रोजी होणार आहे. तर सीरिजचा अंतिम सामना ब्रेबॉर्नस्टेडियमवर (सीसीआय) 22 मार्च 2020 रोजी खेळला जाईल.

अधिक वाचा  एसटीमहामंडळ 'चालक'आणि वाहक म्हणून करणार यांचा वापर

सर्व सामने सायंकाळी 7 वाजता सुरू होतील. कलर्स सिनेप्लेक्स, कलर्स कन्नड सिनेमा आणि दूरदर्शन या वाहिन्यांवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या स्पर्धेमधील एकूण 11 सामन्यांपैकी दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर, चार सामने नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आणि अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. ही ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांमधील माजी क्रिकेटपटूंमध्ये होणार आहे.
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, जहीर खान, ब्रायन लारा, शिवनारायण चंदरपॉल, ब्रेट ली, ब्रॅड हॉज, जॉन्टी र्‍होड्‌स, हशिम आमला, मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंता मेंडिस यांच्यासह अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत.

अधिक वाचा  वैवाहिक बलात्काराच्या वेदना दुर्लक्षितच; पतीचा जबरदस्तीचा संबंध वैधच

असा असेल भारत लेजंड्‌स संघ –
सचिन तेंडुलकर (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, जहीर खान, इरफान पठाण, अजित आगरकर, संजय बांगर, मुनाफ पटेल, मोहम्मद कैफ, प्रग्यान ओझा, समीर दिघे(यष्टीरक्षक), साईराज बहुतु
स्पर्धेचे वेळापत्रक
7 मार्च – भारत वि. वेस्ट इंडीज – वानखेडे (मुंबई)
8 मार्च – ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका – वानखेडे (मुंबई)
10 मार्च – भारत वि. श्रीलंका – डी. वाय. पाटील (नवी मुंबई)
11 मार्च – वेस्ट इंडीज वि. दक्षिण आफ्रिका – डी. वाय. पाटील (नवी मुंबई)
13 मार्च – दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका डी. वाय. पाटील (नवी मुंबई)
14 मार्च – भारत वि. दक्षिण आफ्रिका – एमसीए स्टेडियम (पुणे)
16 मार्च – ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज – एमसीए स्टेडियम (पुणे)
17 मार्च – वेस्ट इंडीज वि. श्रीलंका – एमसीए स्टेडियम (पुणे)
19 मार्च – ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका – डी. वाय. पाटील (नवी मुंबई)
20 मार्च – भारत वि. ऑस्ट्रेलिया – एमसीए स्टेडियम (पुणे)
22 मार्च – अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियम (मुंबई).